पुणे – मराठा आरक्षणाबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याबाबत पडसाद उमटणे सुरू झाले आहे. “भुजबळ हे ओबीसीचे नेतृत्व करत असल्याचे बोलत असले, तरी त्यांनी बारा बलुतेदारांकडेही लक्ष द्यावे,’ असा सल्ला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी राज्य समन्वयक राजेंद्र कोंढरे, रघुनाथ चित्रे पाटील, तुषार काकडे, अमर पवार, बाळासाहेब अमराळे, गणेश मापारी, रेखा कोंडे, जितेंद्र कोंढरे यासह मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कोंढरे म्हणाले, “नाव महात्मा फुलेंचे घ्यायचे, मुखवटा समतेचा घ्यायचा, नेतृत्व ओबीसीचे करतो असे दाखवायचे आणि स्वकल्याणाचाच मार्ग निवडयाचा ही भुजबळ यांची नीती राहिलेली आहे.’
तर, “ओबीसी प्रवर्गातील अनेक जाती आहेत. त्यांच्याबाबतीत भुजबळ फक्त बोलतात, अशी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा आणि समविचारी सर्व संघटना भुजबळ यांचा निषेध करत आहे,’ असे तुषार काकडे म्हणाले.