वॉशिंग्टन: अमेरिकेत आज करोनाचे लाखो पेशंटस् ठिकठिकाणच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यांना उपचार देण्यासाठी जे डॉक्टर्स अहोरात्र प्रयत्नशील आहेत त्यात भारतीय वंशांच्या अनेक डॉक्टरांचाही समावेश आहे. तथापि, त्यात दुर्दैवाची बाब अशी की, या कामात योगदान देणारे अनेक भारतीय डॉक्टरच करोनाचे शिकार बनले असून त्यांना आपल्या प्राणांचेही मोल यात द्यावे लागले आहे.
न्युयॉर्कमधील एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉ. माधवी आया यांनाही नुकतेच करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. करोनाग्रस्तांवर उपचार करताना त्यांनाच करोनाने ग्रासले आणि त्यांना आपल्या पती व मुलीलाही भेटण्याची संधी मिळाली नाही. या दोघांनाही एक शेवटचा एसएमएस संदेश पाठवून त्यांनी इहलोकाची यात्रा संपवली आहे. डॉ. माधवी या 61 वर्षांच्या होत्या. त्या 1994 मध्ये आपल्या पतीसह अमेरिकेत आल्या होत्या. त्यांच्या प्रमाणेच अन्यही भारतीय डॉक्टर्स आज तेथे करोना पेशंटवरील उपचार करताना आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. हे काम करीत असताना मरण पावलेल्या भारतीय डॉक्टरांची संख्या काही डझन आहे.
न्युयॉर्क आणि न्यू जर्सी येथील रुग्णालयांमध्ये मरण पावलेल्या भारतीय डॉक्टरांची संख्या बरीच आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच प्रिया खन्ना नावाच्या 43 वर्षीय भारतीय डॉक्टरलाही आपले प्राण अशाच पद्धतीने गमवावे लागले आहेत. तिचे वडील सत्येंद्र खन्ना हेही जनरल सर्जन असून तेही करोनाचे शिकार बनले आहेत. त्यांची प्रकृतीही गंभीर असल्याचे सांगण्यात येते. तेही न्यू जर्सीच्या त्याच हॉस्पिटलमध्ये सेवा देत होते जिथे त्यांची कन्या दगावली आहे. अशी अनेक प्रकरणे सध्या तेथे चर्चेत आहेत. आपल्या प्राणांचे मोल देऊन हे डॉक्टर्स तेथे सेवा देत असल्याने त्यांचे कौतुकही होत आहे.