काबूल : अफगाणिस्तानमधील राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानातील 20 जणांना करोनाची बाधा झाली आहे. मात्र या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी आले होते की नाही याची निश्चित माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. घनी यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवले असून ते केवळ काही अधिकाऱ्यांनाच भेटले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
70 वर्षीय आणि कर्करोगाशी लढणारे घनी हे करोनाच्या धोकादायक गटात मोडतात. अफगाणिस्तानात सोमवार पर्यंत 993 करोना बाधित आढळले आहेत. गेल्या दोन महिन्यात इराणमधून आलेल्या दोन लाख जणांवर प्रशासन लक्ष ठेवून आहे.