वाघोली (प्रतिनिधी) – मराठा समाज अनेक वर्षांपासून आरक्षणाच्या चळवळीमध्ये सहभागी होत आहे. अनेक मोर्चे आंदोलने झाली आहेत. आज मराठा समाजाच्या आंदोलनाला मराठा समाज व इतर यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याने हा जनसमुदाय आता राज्य सरकारकडून आरक्षण मिळवल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्वाणीचा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.
वाघोली तालुका हवेली येथील आर. के हाऊस च्या मोकळ्या मैदानात मुक्कामी आलेल्या सर्व बांधवांसाठी वाघोली आणि पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने जेवणाची राहण्याची तसेच इतर सुविधा पुरविण्यात आल्या. पुणे अहमदनगर रस्त्यावरील सर्व गावच्या नागरिकांना भेटून मराठा समाजाचा मोर्चा वाघोली येथील आर. के हाऊस मैदानावर पहाटे चारच्या सुमारास पोहोचला. यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले.
यावेळी उपस्थित वाघोलीकर आणि पंचक्रोशीतील नागरिकांना संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. मराठा समाजाची एकी दिवसेंदिवस वाढत असून सरकारला या एकीपुढे झुकावे लागणार आहे. मराठा समाज एकसंध राहणे काळाची गरज आहे. या आंदोलनास नागरिकांचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तहानभूक विसरून मराठा समाज बांधव कडाक्याच्या थंडीत आरक्षण मिळवण्याच्या भूमिकेत ताठ मानेने उभा आहे.
पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी केलेले स्वागत आणि आंदोलन दिलेला पाठिंबा कौतुकास्पद असून हाच पाठिंबा मुंबई येथील उपोषणाच्या स्थळी देखील राहावा यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मुंबईमध्ये यावे असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. वाघोली मध्ये सायंकाळी पाच वाजल्यापासून ते पहाटेच्या पाच वाजेपर्यंत पुणे नगर रस्त्यावर तसेच ज्या ठिकाणी मोर्चातील समाज बांधव मुक्कामी आहेत अशा ठिकाणी जेवणाची राहण्याची तसेच इतर सुविधा वाघोली व पंचक्रोशीतील नागरिकांनी लोक वर्गणी तसेच दानशूर व्यक्तींनी मदत करून एक अनोखा आदर्श उभा केला.
ठिकठिकाणी होत असलेल्या स्वागतामुळे जरांगे पाटील यांना वाघोलीत येण्यास उशीर झाला मात्र पुण्यनगरीतील स्वागताने जरांगे पाटील भारावून गेले. ढोल ताशा तसेच लाऊड स्पीकर साऊंड सिस्टिम यांच्या माध्यमातून गाण्यावर ठेका धरत अनेकांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आपला आनंद द्विगुणीत केला. मोबाईल मधील टॉर्च चालू करून लख्ख दिव्यांचा प्रकाश जणू जरांगे पाटलांच्या स्वागताला उभा केल्याने सोशल मीडियावर विविध फोटो आणि चित्रफितींनी जरंगे पाटलांचे स्वागत करून 26 जानेवारी रोजी होणाऱ्या आंदोलनाला सर्वसामान्य नागरिकांनी देखील पाठिंबा दर्शवला.