लाहौर – मनीषा रुपेता या पाकिस्तानातील २६ वर्षीय हिंदू महिलेने इतिहास रचला आहे. त्या पाकिस्तानच्या पहिल्या हिंदू महिला डीएसपी बनल्या आहेत. मनीषाने 2019 मध्ये सिंध लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. आयोगाने नुकतेच निकाल जाहीर केले, ज्यामध्ये मनीषाने 16 वा क्रमांक मिळवून हा विक्रम केला.
पाकिस्तानातील मागासलेल्या जकूबाबाद जिल्ह्यातील मनीषा रुपेता या हिंदू महिलेने इतिहास रचला आहे. त्या पाकिस्तानच्या पहिल्या हिंदू महिला डीएसपी बनल्या आहेत.
सिंध प्रांतातील जकूबाबाद जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या २६ वर्षीय मनीषा हिने २०१९ मध्ये सिंध लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. आयोगाने नुकतेच निकाल जाहीर केले, ज्यामध्ये मनीषाने 16 वा क्रमांक मिळवून हा विक्रम केला.
रुपेताने जिओ न्यूजला सांगितले की, मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप कष्ट करावे लागले, कदाचित मला इतरांपेक्षा जास्त मेहनत करावी लागली असेल. कधी-कधी वाटायचं की दिवस असेच जातील आणि अभ्यासाशिवाय काहीच करता येणार नाही.
रुपेता सांगते की, मला नेहमीच काहीतरी वेगळं करायचं होतं. माझ्या तिन्ही बहिणींनी वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. मी देखील MBBS करावं अशी सर्वांची अपेक्षा होती पण परीक्षा पास न झाल्याने मी पोलीस सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला.
असा केला अभ्यास
मनीषा सांगते की, तिच्या बहिणींप्रमाणे तिनेही एमबीबीएसची परीक्षा दिली पण उत्तीर्ण होऊ शकली नाही. यानंतर मनिषाने फिजिकल थेरपीमध्ये पदवी घेतली.
मनीषा सांगते की, मला पोलिसांचा गणवेश खूप आवडायचा, त्यामुळे मी कोणालाही न सांगता गुप्तपणे सिंध लोकसेवा आयोगाची तयारी करायला लागले.
महिलांची दयनीय अवस्था पाहून खाकी निवडली
मनिषा सांगते की, पाकिस्तानातील महिला सामान्यतः पोलिस स्टेशन आणि कोर्टात जाण्यास कचरतात. कुटुंबातील पुरुष सदस्यासोबतच त्या या ठिकाणी जातात. चांगल्या घरातील मुली पोलिस ठाण्यात जात नाहीत, असा समज आहे, हा समज मला बदलायचा होता. पोलीस पेशाने मला नेहमीच मोहित केले आणि प्रेरणा दिली. समाजातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी पोलीस महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे मला नेहमीच वाटत होते.
शेजाऱ्यांचा संशय
माझ्या यशाने लोक खूश असल्याचे मनीषा सांगते. आपल्या समाजातही आनंदाचे वातावरण आहे. संपूर्ण देश माझे कौतुक करत आहे पण माझे नातेवाईक म्हणतात की मी लवकरच नोकरी बदलेल.
ती म्हणते, पुरुषप्रधान समाजात पुरुषांना वाटते की केवळ तेच पोलीस होऊ शकतात. ही त्यांची विचारसरणी असेल पण येत्या काही वर्षांत या लोकांचे मत बदलेल. असे विचार असलेल्यांपैकीच कोणाची मुलगी पोलीस सेवेत दाखल होईल.
वयाच्या १३ व्या वर्षी वडिलांचा मृत्यू आणि संघर्ष
कवितांची आवड असलेल्या मनीषा रुपेतासाठी हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. ती फक्त 13 वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पाच मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी त्यांची आई कराचीला आली. त्यांच्या कुटुंबात आईशिवाय तीन बहिणी आणि एक भाऊ आहे.
आपल्या संघर्षमय दिवसांची आठवण करून देताना मनीषा सांगते की, जकूबाबादचे वातावरण तिच्या अभ्यासात सर्वात मोठा अडथळा होता. तिथे मुलींना लिहायला आणि अभ्यास करायला परवानगी नव्हती. मुलींना फक्त वैद्यकशास्त्र शिकण्याची परवानगी होती. मनीषाच्या तीन बहिणी एमबीबीएस डॉक्टर आहेत आणि तिचा लहान भाऊही वैद्यकीय शिक्षण घेत आहे.
याआधी सिंधमधील उमरकोट जिल्ह्यातील पुष्पा कुमारी यांनी सिंध पोलिसात पहिली हिंदू सहाय्यक उपनिरीक्षक बनून विक्रम केला होता.