पिंपरी – करोनाच्या पार्श्वभूमीवर चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने दरवर्षी काढण्यात येणारी मंगलमूर्तींची माघी यात्रा यंदा साधेपणाने काढण्यात येणार आहे. या यात्रेसाठी मंगलमूर्तींच्या रथाला परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे येत्या रविवारी (दि. 14) मंगलमूर्तींच्या पालखीचे देव वाहनातूनच चिंचवड येथून थेट मोरगावला प्रस्थान करणार आहे, अशी माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी दिली.
माघी यात्रेसाठी 10 ते 15 जणांनाच परवानगी मिळाली आहे. त्यामुळे माघी यात्रेसोबत जाणाऱ्या भाविकांचे प्रमाणही यंदा मोजकेच असणार आहे. तसेच, दरवर्षी 11 दिवसांची माघी यात्रा असते. यंदा मात्र ही यात्रा सहा दिवसांचीच असणार आहे. महान गणेशभक्त श्री मोरया गोसावी यांनी इ.स.1561 मध्ये चिंचवड येथे संजीवन समाधी घेतली. त्यांना श्री क्षेत्र मोरगाव येथे तपश्चर्येने श्री मंगलमूर्तींची मूर्ती प्राप्त झाली. ती मूर्ती वर्षातून दोन वेळा श्री क्षेत्र मोरगावला पालखीतून व रथातून नेण्याची फार पूर्वीपासूनची प्रथा आहे.
यात्रेचे चिंचवड येथून येत्या रविवारी दुपारी दोन वाजता मोरगावकडे प्रस्थान होणार आहे. रविवार (दि.14) ते मंगळवार (दि. 16) असे तीन दिवस मोरगाव येथे माघी यात्रेचा मुक्काम असेल. तेथुन बुधवारी (दि. 17) दुपारी जेजुरी येथे प्रयाण होईल. रात्री थेऊर येथे मुक्कामासाठी यात्रा पोहचेल. थेऊरला धुपारतीचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी (दि. 18) दुपारचा नैवेद्य होऊन सिद्धटेक येथे प्रस्थान होईल. सिद्धटेकला रात्री 2 वेगवेगळ्या धुपारती होणार आहे. शुक्रवारी (दि. 19) नैवेद्य आणि प्रसादाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर दुपारी 1 वाजता माघी यात्रेचे चिंचवडसाठी प्रस्थान होणार आहे. यंदा श्री मंगलमूर्तींची माघी यात्रा अत्यंत साध्या पद्धतीने शासनाच्या आदेशानुसार पार पडणे आवश्यक असल्याचे मंदार महाराज देव यांनी सांगितले.