पोलीस निरीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये मध्ये घडली आहे. नोकरीतील तणावामुळे पोलीस निरीक्षकाने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीद्वारे समोर आले आहे.
वेदप्रकाश यादव असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस निरीक्षकाचे नाव असून ते फतेहपूर कोतवाली येथे कर्तव्यास होते. नोकरीच्या ठिकाणी ते एकटेच राहत होते. त्यांची पत्नी आणि मुले लखनौमध्ये राहतात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीची ड्युटी संपवून यादव आपल्या खोलीत गेले. रात्री 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले व त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला व त्यानंतर कुटुंबीयांना याविषयी माहिती दिली.
अतिरिक्त एसपी पूर्णेंदू सिंग यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याजवळ औषधे आणि डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन मिळाले आहेत.मानसिक तणाव दूर करण्यासाठीचे हे औषधं होती. यावरून यादव मानसिक तणावात होते हे दिसून आले. त्यामुळे त्याने आत्महत्या केली, या प्रकरणाची चौकशी सुरू असून, लवकरच या प्रकरणाचा छडा लावला जाईल. पुढिल तपास सुरू आहे.