15 ऑगस्ट 2021… म्हणजे अफगाणिस्तानवर तालिबानचा हल्ला झाला तेव्हा राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी देश सोडून पळ काढला. त्यांना यूएईने आश्रय दिला होता. मात्र दुसऱ्या बाजूला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वेलोडिमिर झेलेन्स्की आहेत. ज्यांना आपले सैन्य रशियाला जास्त काळ टिकवून ठेवू शकणार नाही हे माहिती असूनही गुडघे टेकण्यास नकार दिला आहे. युक्रेनच्या संरक्षणासाठी अमेरिकेची ती ऑफरही झेलेन्स्कीने नाकारली आहे ज्यामध्ये त्यांना सुरक्षित राहण्याची ऑफर देण्यात आली होती.
वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, रशियन हल्ल्यांदरम्यान अमेरिकेने युक्रेनचे अध्यक्ष वेलोडिमिर झेलेन्स्की यांना देशातून बाहेर काढण्याची ऑफर दिली होती. तथापि, झेलेन्स्कीने याला नकार दिला असून त्यांनी लढण्यासाठी शस्त्राची गरज आहे, गाडीची नाही, असे म्हटले आहे.
अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएचे संचालक विलियम जे बर्न्स यांनी जानेवारीत झेलेन्स्की यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी राष्ट्रपतींना त्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर इशारा दिला होता. यानंतर, रशियन बाजूने घडामोडी वेगाने वाढल्या आणि आता कीव ताब्यात घेण्याची लढाई अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.या लढ्यादरम्यान, अमेरिकन सरकारकडून असे सांगण्यात आले आहे की अमेरिका युक्रेनमधून झेलेन्स्कीला कधीही सुरक्षीत बाहेर काढण्यास तयार आहे. त्यामुळे त्यांना रशियन सैनिकांनी पकडले किंवा मारले जाण्यापासून वाचवले जाऊ शकते.
अमेरिकेच्या या प्रस्तावादरम्यान झेलेन्स्कीने एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यामध्ये त्यांनी युक्रेनच्या स्वातंत्र्यासाठी शेवटपर्यंत लढा देणार असल्याचा संदेश दिला आहे. व्हिडीओमध्ये ते म्हणाले की आम्ही सगळे इथे आहोत. आमचे सैन्य येथे आहे. सर्व नागरिक येथे आहेत. आपण सर्वजण आपल्या स्वातंत्र्याचे, आपल्या देशाचे रक्षण करत आहोत आणि पुढेही करत राहू.