ममता बॅनर्जी की सुवेंदू अधिकारी? नंदिग्रामची जनता उद्या करणार फैसला

कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण ३० जागांसाठी मतदान होणार असून यामध्ये नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. निवडणुकांच्या तोंडावर तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकत भाजपच्या गोटात सामील झालेले सुवेंदू अधिकारी हे सध्या नंदिग्राम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतायेत. मात्र यंदा नंदीग्राम येथे त्यांना थेट तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आव्हान दिलंय. 

पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये ‘नंदीग्राम’ला विशेष महत्व आहे.  २०००च्या दशकात ममता बॅनर्जी यांनी येथेच शेतकऱ्यांच्या हक्कांची पायमल्ली होत असल्याचा दावा करत आंदोलन छेडलं होत. आंदोलनाचा चेहरा बनलेल्या ममतांनी पुढे राज्यातील डाव्यांची सत्ता उलथवून टाकत सत्तेच्या चाव्या काबीज केल्या होत्या.

राजकीयदृष्टया महत्वाच्या असलेल्या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाचे महत्व यंदा अधिकच वाढलं आहे. येथे तृणमूलचे महत्वाचे नेते मानले जाणारे सुवेंदू अधिकारी यंदा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तर दुसरीकडे पक्षाला लागलेली गळती व राज्यात भाजपने लावलेली संपूर्ण ताकद या परिस्थितीत ममता बॅनर्जी लढा देत आहेत. नंदिग्रामचे महत्व जाणूनच भाजपच्या गोटामध्ये सामील झालेल्या सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय ममता बॅनर्जींनी घेतलाय.

तर, सुवेंदू अधिकारी यांना भाजपने चांगलंच बळ दिल्याचं दिसतंय. एवढंच काय तर पक्षाने त्यांना  आधीच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमधून देखील मुक्त केलंय. सुवेंदू अधिकारी तृणमूल काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यासह पक्षाच्या इतर नेत्यांवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप लगावले होते. ‘नारदा स्कॅम’ म्हणून प्रचलित असलेल्या या स्टिंग ऑपरेशनचे व्हिडीओ देखील समाज माध्यमांवर झळकले. मात्र सुवेंदू यांच्या भाजप प्रवेशानंतर आता ते डिलीट करण्यात आले आहेत.

पक्षबदलानंतर सुवेंदू यांनी देखील नव्या विचारसरणीसोबत जुळवून घेतलं असून त्यांच्या प्रचार सभांमध्ये याचीच झलक पाहायला मिळते. नुकत्याच नंदीग्राम येथे झालेल्या प्रचार सभेत त्यांनी हिंदू मतदारांना, ‘तुम्ही ७० टक्के आहात ३० टक्के नाही’ हे लक्षात ठेवा असं सांगितलं. अर्थातच त्यांना मतदारसंघात मुस्लिम मतदार अल्पप्रमाणात आहेत हेच सांगायचं होत. प्रचारसभेत ते, ‘ममता बॅनर्जी जिंकल्यास पाकिस्तानला आनंद होईल’ असं देखील म्हणाले.

सुवेंदू अधिकारी यांच्या भाजप प्रवेशास राजकीय धोबीपछाड न दिल्यास ते पक्षाच्या प्रतिमेसाठी व विधानसभा निवडणुकांसाठी तोट्याचे ठरू शकते हे जाणूनच ममता बॅनर्जी यांनी नंदिग्रामची निवड केली. मात्र ममतांचा हा निर्णय योग्य आहे की अयोग्य हे निवडणूक निकालांच्या दिवशी म्हणजे २ मे ला समजेलच. मात्र नंदिग्राममधील मतदार उद्या दोन बड्या नेत्यांचे राजकीय भवितव्य उद्या मतपेट्यांमध्ये बंद करतील. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.