अहमदाबाद – देशातील पहिल्या अहमदाबाद-केवडिया सीप्लेन सेवा दुरुस्तीच्या कारणास्तव तीन आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आली आहे. या सीप्लेन सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 31 ऑक्टोबर 2020 रोजी करण्यात आले होते. परंतु उद्घाटानंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत ही सेवा बंद करण्यात आली आहे.
मालदीवरून विमान परतल्यानंतर सीप्लेन सेवा पुन्हा 15 डिसेंबरपासून पुन्हा सुरू केली जाणार आहे. याबाबत यापूर्वीपासूनच ठरवण्यात आले होते. त्यामुळेच 27 नोव्हेंबर नंतर कोणत्याही प्रकारचे बुकींग घेण्यात करण्यात आले नाही, अशी माहिती स्पाईस जेटच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली.
आतापर्यंत 800 प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. दररोज दोन सीप्लेन उड्डाणांचे संचालन करण्यात येते. या योजनेअंतर्गत एका मार्गाचे भाडे दिड हजार रुपयांपासून सुरू होते. स्पाईस जेटने यासाठी मालदीवकडून एक सीप्लेन विकत घेतले आहे. यामध्ये एकावेळी 12 प्रवासी प्रवास करू शकतात.