डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी
पुणे – येत्या मंगळवारी (दि.14) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कशाप्रकारे साजरी करावी, याबाबत मार्गदर्शक सूचना राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतातील बौद्ध बांधवांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने जारी केल्या आहेत. महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी या सूचना जारी केल्या आहेत. या माध्यमातून त्यांनी राष्ट्रहितास सहकार्य करण्याचे भीमसैनिकांना आवाहन केले आहे.
संपूर्ण जगावर करोनाचे सावट असल्याने यंदा डॉ. बाबासाहेब यांच्या जयंतीदिनी सार्वजनिक ठिकाणी शोभायात्रा, मिरवणुका काढू नयेत. वाद्ये वाजवू नयेत. फटाक्यांची आतषबाजी करण्याऐवजी घरावर विद्युत रोषणाई करावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतमबुद्ध यांची प्रतिमा अथवा मूर्ती समोर ठेवून सकाळी आठ वाजता त्रिशरण, पंचशील, भीमस्मरण, भीमस्तुती घ्यावी. घरावर पंचशील झेंडा लावावा. समता सैनिक दलाच्या जवानांनी आपल्या गणवेशात बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना द्यावी. साजरा केलेल्या जयंतीचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करावेत. कोणत्याही उपासक-उपासिकेने घराबाहेर पडून संचारबंदीचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी. एकमेकांना सोशल मीडियातून शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय कार्यकारिणीने दिलेल्या मार्गदर्शक सूचना सर्व पदाधिकाऱ्यांना सोशल मीडियातून कळवल्या आहेत. त्यानुसार सर्व पदाधिकाऱ्यांच्या आम्ही संपर्कात आहोत. यंदा डॉ. आंबेडकर जयंती साजरी करताना सर्व नागरिकांनी करोनाशी दोन हात करत आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पडण्याच्या सूचना केल्या आहेत.
लक्ष्मण दुधवडे-गुरुजी, पुणे जिल्हाध्यक्ष (पश्चिम), भारतीय बौद्ध महासभा