वॉशिंग्टन – करोनाने अमेरिकाला जबरदस्त तडाखा दिला आहे. त्या देशातील पाच लाख नागरीकांना करोनाने ग्रासले असून मृतांचा आकडा वेगाने वीस हजाराच्या दिशेने चालला आहे. अशा अवस्थेत अमेरिकेची सारी अर्थव्यवस्थाही ठप्प झाली आहे.
पण या साऱ्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मात्र अमेरिका पुन्हा त्वरीत सुरू करण्यास अत्यंत उत्सुक असून त्यांनी या विषयी सरकारला सल्ला देण्यासाठी एक मंडळ स्थापन केले आहे. त्यात त्यांनी वैद्यकीय आणि व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश केला आहे. अमेरिका पुन्हा सुरू व्हावी, आणि ती शक्य तितक्या लवकर सुरू व्हावी यासाठी आपण उत्सुक आहोत असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. येत्या काही तिमाहीतच अमेरिका पुन्हा जोरदार उसळी मारून पुढे येईल असा विश्वासही ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.
आज 95 टक्के अमेरिका होम क्वारंटाईन आहे. अमेरिकेतील सारेच उद्योग व्यवसाय बंद असून त्यामुळे गेल्या पंधराच दिवसांत अमेरिकेतील 1 कोटी 70 लाख लोक बेरोजगार झाले आहेत. ट्रम्प म्हणाले की या साऱ्यावर मी एक कौन्सिल नेमले आहे. हे कौन्सिल अर्थव्यवस्थेच्याही पलिकडे जाऊन अमेरिकेच्या हिताचा सल्ला प्रशासनाला देईल. जितक्या शक्य होईल तितक्या लवकर मला अर्थव्यवस्था खुली करायची आहे. हा देश मला पुन्हा पुर्ववत करायचा आहे.
हे आपण नेमके कधी करायचे आहे याचा सल्ला देण्यासाठीच आम्ही आज एक तज्ज्ञांचे कौन्सिल स्थापन केले आहे असे ट्रम्प यांनी आज व्हाईट हाऊस मधून पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की येत्या काही महिन्यातच अमेरिका पुन्हा वेगाने उसळून वर येईल. काही तरी नक्की चांगले घडणार आहे, आणि ते अपेक्षेपेक्षाही चांगले असेल असेही त्यांनी यावेळी नमूद केले.