कान्हे – नव्या वर्षातील पहिला सण असणाऱ्या मकरसंक्रांतीचे सर्वांनाच वेध लागले आहेत. तिळगूळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत या उत्सवाचा गोडवा वाढवला जातो. पण, दरवर्षी मकर संक्रांती १४ की १५ तारखेला, असा प्रश्न असतो. सूर्य आराधना व स्नानदानाचा उत्सव म्हणून ओळख असलेली मकर संक्रांती यंदा १५ जानेवारीला साजरी होणार आहे.
गेल्या दहा वर्षांत सातवेळा १५ जानेवारीला मकर संक्रांती आली आहे. १५ जानेवारीला विशेष पुण्यकाळ सकाळी ९.२४ वाजता सुरू होऊन दिवसभर राहील. गतवर्षासह २०१५, २०१६, २०१८, २०१९, २०२० मध्ये मकरसंक्रांती १५ जानेवारीला साजरी करण्यात आली. गेल्या दहा वर्षांत सातवेळा असा योग आला. सूर्याचा मकर राशीत प्रवेश होताना मकरसंक्रांती उत्सव साजरा करण्यात येतो.
इंग्रजी कालदर्शिकनुसार २००० पूर्वी १३ जानेवारीच्या मध्यरात्री सूर्याचा मकर राशीत प्रवेश होत असे. त्यामुळे १४ जानेवारीला मकर संक्रांती साजरी केली जात असे. गेल्या काही वर्षात मकर संक्रांती १४ जानेवारीच्या मध्यरात्री येते व १५ जानेवारीला साजरी केली जाते. यंदाही संक्रांती १५ जानेवारीला सकाळी ९.२४ वाजता सुरू होणार आहे. पुढच्या वर्षी मकर संक्रांती १४ जानेवारीला साजरी होणार आहे. त्यानंतर वेळोवेळी १४ जानेवारीला संक्रांती अर्की होऊन १५ जानेवारीला साजरी केली जाईल. यंदा पौष महिन्याची मकर संक्रांती असल्याने हा उत्सव फलदायी असणार आहे.
तीन वर्षांनी तासाने वाढ
उल्लेखनीय म्हणजे, दर ७० वर्षांनंतर संक्रांती पर्व एक दिवसाने वाढत असते. दर तीन वर्षांनी अधिक मासामुळे एक महिना वाढतो. त्याप्रमाणे दर तीन वर्षांत संक्रांती काळ एका तासाने वाढतो. यानुसार ७० ते ८० वर्षांत एक दिवस वाढतो.