नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणा कोईम्बतूर कार बॉम्बस्फोट प्रकरणी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर एनआयएचे पथक तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या तीन राज्यांमधील अनेक ठिकाणी छापे टाकत असल्याची माहिती समोर येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, एनआयएच्या अधिकाऱ्यांनी 60 ठिकाणांचा शोध घेतला आहे. प्रतिबंधित दहशतवादी संघटना आयएसआयएसशी संबंधित संशयितांना पकडण्यासाठी हा छापा टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या वर्षी दिवाळीच्या एक दिवस आधी कोईम्बतूरच्या संगमेश्वर मंदिरासमोर कारमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला होता. या स्फोटात 25 वर्षीय जेमशा मुबीनचा मृत्यू झाला. जेमशा त्याच्या इतर साथीदारांसह दक्षिण भारतातील अनेक भागात बॉम्बस्फोटांचा कट रचत असल्याचं तपासात समोर आलंय.
पोलिसांना जेमशाच्या घरात स्फोटकांचा मोठा साठा सापडला होता. झडती दरम्यान कोईम्बतूर रेल्वे स्टेशन, शहर पोलीस आयुक्त कार्यालय, कोईम्बतूर जिल्हाधिकारी कार्यालय, रेसकोर्स आणि व्हिक्टोरिया हॉलचे नकाशेही सापडले. जेमशा आयएसआयएसच्या संपर्कात असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कर्नाटकातील मंगळुरूमध्ये ऑटो रिक्षात प्रेशर कुकर बॉम्बचा स्फोट झाला होता. या स्फोटात आरोपी मोहम्मद शारिक हा देखील जखमी झाला. अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी शारिक बराच काळ फरार होता.