पणजी : इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पाचव्या दिवशी आज माहितीपट निर्मात्यांच्यावतीने एक पत्रकार परिषद घेण्यात आली. माहितीपट निर्मात्यांना निधी मिळवणे आणि प्रेक्षकवर्गांची साथ मिळणे या समस्यांचा सामना करावा लागतो, असे मत भारतीय माहितीपट निर्माता संघाच्या अध्यक्ष उषा देशपांडे यांनी मांडले.
माहितीपट प्रेक्षकांसमोर दर्शवले जाण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करतो, यासाठी देशभर महोत्सवही भरवतो. आता अनेक शहरांमध्ये फिल्म प्रभागाच्या सहकार्याने दर आठवड्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी माहितीपट दाखवले जातात. आणखी वीस शहरामध्ये याचा विस्तार केला जात आहे, अशी माहिती देशपांडे यांनी यावेळी दिली. माहितीपट निर्मात्यांचे कार्य साधारणत: पत्रकारांसारखेच असते. त्यामुळे त्यांनी एक नि:पक्षपाती दृष्टीकोन अवलंबणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या.
माहितीपट निर्मात्यांना संघाकडून प्रशिक्षणाच्या सोयी पुरवल्या जातात. चार विद्यापीठांच्या सहकार्याने कार्यशाळा आयोजल्या जातात. परंतु माहितीपट निर्मात्यांना सुनिश्चितपणे काम मिळावे, यासाठी चित्रपट धोरणात बदल करणे गरजे आहे, असे संघाचे महासचिव संस्कार देसाई यांनी सांगितले. दूरदर्शनवर माहितीपटासाठी वेळ दिला जातो. आतापर्यंत 60 माहितीपट दाखवण्यात आले आहेत. दूरदर्शन या प्रसारणासाठी चांगले पैसेही देते असेही ते म्हणाले.