Mahayuti Meeting – महाराष्ट्रातील जागा वाटपाच्या मुद्यावरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये निर्माण झालेला गुंता जवळपास सुटला आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी काल (शुक्रवारी) रात्री उशिरा झालेल्या बैठकीत जागा वाटपाच्या मुद्यावर तोडगा निघाला आहे.
या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह राज्यांतील तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित होते. ही बैठक रात्री सव्वा दहाच्या सुमारास सुरू झाली होती आणि साडेबारापर्यंत चालली.
महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. यातील पंधरा-सोळा जागांवर शिवसेनेने आपला दावा केला आहे. कारण, एकनाथ शिंदे यांच्यासोबत 13 खासदारांसह बरेच ज्येष्ठ नेते रालोआत आले होते. या सर्वांना निवडणुकीच्या मैदानात उतरवायचे आहे. याशिवाय, राष्ट्रवादी कॉग्रेसने सुध्दा नउ जागांची मागणी केली असल्याचे समजते.
मात्र, भाजपला लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करायची नाही आहे. यावेळी चारशे जागांचे लक्ष्य गाठायचे आहे. यामुळे एक-एक जागेचा निर्णय अत्यंत विचार करून घेतला जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉग्रेसच्या काही जागा संकटात असल्याची बाब अंतर्गत सर्वेक्षणात दिसून आली आहे.
अमित शहा यांच्यासोबत काल रात्री झालेल्या बैठकीत या सर्व मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली असून तिन्ही पक्षांतील जागा वाटपाचा तिढा आता जवळपास सुटला आहे. याची घोषणा लवकरच केली जाणार आहे.
भाजपातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भाजपने शिवसेना आणि राकंपुढे दोन प्रस्ताव दिले असल्याचे समजते. जेणेकरून 48 पैकी किमान 45 जागांवर रालोआचे उमेदवार विजयी होतील.
पहिल्या प्रस्तावानुसार, भाजप 34, शिवसेना 10 आणि राकॉ चार जागा लढवू शकते. हा प्रस्ताव मान्य झाला तर विधानसभेच्या निवडणुकीत भाजपकडून भरपाई केली जाणार आहे. । Mahayuti Meeting
दुसऱ्या प्रस्तावानुसार, 30 जागा भाजप लढविणार. शिवसेना 12 आणि राकॉं सहा जागा लढविणार. परंतु, शिवसेना आणि राकंचे दोन-तीन उमेदवार त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर नव्हे तर भाजपच्या तिकीटवर निवडणूक लढतील. यात जागांची अदलाबदल सुध्दा होण्याची शक्यता आहे.
याशिवाय आणखी एका तिसऱ्या प्रस्तावाची सुध्दा चर्चा आहे. यानुसार शिवसेना 13 जागा लढविणार आणि राकॉं पाच जागा लढविणार. उर्वरित 30 जागा भाजपकडून लढविल्या जातील. मात्र यातही दोन्ही पक्षांचे उमेदवार भाजपचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. । Mahayuti Meeting