पुणे – आज समाजातील महिला वेगवेगळ्या उच्च पदांवर बेधडकपणे काम करतात. याचे सर्व श्रेय क्रांतीज्योती ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई यांनाच जाते. त्यांच्या जीवनावर आधारित “सत्यशोधक’ या चित्रपटाचे टिझर रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आला. या चित्रपटात ज्योतिरावांच्या प्रमुख भूमिकेत संदीप कुलकर्णी दिसतील.
“संभाजी ब्रिगेड’ आणि “भारत मुक्ती मोर्चा’ यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त “सत्यशोधक संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने संमेलनात फुले दाम्पत्यावरील या चित्रपटाचे टिझर लॉन्च करण्यात आले. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून पवार उपस्थित होते.
“विद्येविना मती गेली, मतिविना निती गेली..’ अशा कठोर शब्दांत शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या ज्योतिरावांच्या आयुष्यातील संघर्ष आता मोठ्या पडद्यावर साकारणार आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल. अभिनेते संदीप कुलकर्णींसह राजश्री देशपांडे, गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रवींद्र मंकणी ही कलाकार मंडळी चित्रपटात झळकतील. या टिझर लॉन्च सोहळ्याला वामन मेश्राम, प्रवीण गायकवाड, बाबा आढाव, मा. म. देशमुख, आ. रोहित पवार, व्ही. व्ही. जाधव, ऍड. वासंती नलावडे, विठ्ठल सातव, डॉ. जे. के. पवार उपस्थित होते.