वाघोली – येथील वाघेश्वर इंग्लिश स्कूलच्या परीक्षा केंद्रामध्ये सुरू असलेल्या दहावीची परीक्षा देण्यासाठी येणारे विद्यार्थी, पालकांची व वाहनांची प्रचंड गर्दी होत असल्याने रहदारीचा रोड ब्लॉक होत आहे. याबाबत परिसरातील नागरिक तक्रार करीत आहेत. याठिकाणी वाहतूक नियमनासाठी पोलिसांची, वॉर्डनची नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे.
दहावीच्या परीक्षा सुरु झाल्या असल्याने वाघोली परिसरातील तीन केंद्रांवर परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी येत आहेत. विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दीदेखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. बाजारतळ मैदानाच्या शेजारी असणाऱ्या वाघेश्वर इंग्लिश स्कूल येथील परीक्षा केंद्रावर येणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत पालक मोठ्या संख्येने येत आहेत. परीक्षा सुरू होण्याच्या एक तास अगोदर पालकांचा मोठा घोळकाच प्रवेशद्वारासमोर जमा होत आहे.
विद्यार्थी आत गेल्यानंतर पालक प्रवेशद्वारासमोरून बाजूला होण्याची तसदी घेत नाहीत. वाहनांची अस्ताव्यस्त होणारी पार्किंग आणि पालक रस्त्याच्या मधोमध उभे राहत असल्याने मुख्य रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. स्कूलच्या समोरील बाजूच्या रस्त्याने नागरिकांना जाताना तारेवरची कसरतच करावी लागते.
त्याचप्रमाणे वाहनांना पार्किंगसाठी जागा नसल्याने रस्त्याच्या कडेलाच मोठ्या प्रमाणात वाहने लावत आहेत. परिसरातील नागरिक व वाहनचालक याबाबतबत तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. परीक्षा सुरू होण्या अगोदर व परीक्षा सुटण्याच्या वेळेस याठिकाणी वाहतूक नियमन व गर्दी हटविण्यासाठी नियोजन वाहतूक पोलीस-वॉर्डन नियुक्त करण्यात यावा अशी मागणी होत आहे.
परीक्षा केंद्रासमोर होणाऱ्या गर्दीबाबत उपाययोजना करण्यात येतील.
-रामदास वालझाडे, गटशिक्षणाधिकारी