फलटण – बालआंनद मेळाव्यात नऊ सर्कल जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना “राष्ट्रवादी पुन्हा’ या राष्ट्रवादीच्या निवडणूक प्रचारातील गाण्यावर शिक्षकांनी थिरकायला लावल्याची घटना उघडकीस आली. आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
याबाबत माहिती अशी, नऊ सर्कल (फडतरवाडी), ता. फलटण येथील जिल्हा परिषद शाळेत नुकताच बालआनंद मेळावा झाला. तेथील शिक्षकांनी “डीजे’वर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभा निवडणूक प्रचारात वाजविण्यात येणारे “राष्ट्रवादी पुन्हा।।’ हे गाणे वाजवण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या गीतावर नृत्य करण्यास भाग पाडले. शिक्षकांचा आदेश शिरसावंद्य मानून ही मुले या गीतावर थिरकली.
या प्रकरणी फलटणचे माजी नगरसेवक राजेश शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे व शिक्षण आयुक्तांकडे लेखी तक्रार करून संबंधित शिक्षकांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. ही घटना उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.