डोर्लेवाडी – देशासह महाराष्ट्रात करोनाने थैमान घातले आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणात करोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. यातच मंगळवारी (दि. 28) रात्री पोलिसांची नजर चुकवून चार जण बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी (वैदू वस्ती) गावात दाखल झाले आहेत.
डोर्लेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच, पोलीस पाटील, सदस्य, आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी शहर पोलिसांना बाहेरून आलेल्या व्यक्तीबाबत कल्पना दिली. बारामती शहराचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्मराज गंफले यांनी डोर्लेवाडी गावात येऊन वैदू वस्तीवर जाऊन करोनाबाबत माहिती देऊन जनजागृती करत पुण्यावरून आलेल्या चार जणांना डोर्लेवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 14 दिवसासाठी क्वारंटाइन केले आहे.
त्यांना लागणाऱ्या सर्व सुविधा पुरवल्या जाणार आहेत. त्यांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात आली असून, त्यांना सध्यातरी कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. मात्र खबरदारी घेणे गरजेचे आहे. जर कोणी प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील असा इशारा देण्यात आला आहे.