पिंपरी – करोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे शहरातील करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भविष्यकाळात निर्माण होणारा धोका किंवा वाढणारी रुग्ण संख्या विचारात घेऊन अधिकच्या खाटांची व्यवस्था असणे आवश्यक आहे. त्यासाठी भविष्यकालीन तरतूद म्हणून राज्य कामगार विमा योजना रुग्णालय (ईएसआय) करोना बाधित रुग्णांसाठी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी आमदार अण्णा बनसोडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
त्यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय (ईएसआय) सर्व सोयींनी परिपूर्ण असून रुग्णालायची क्षमता 100 बेडची आहे. 21 डॉक्टर, 49 स्टाफ नर्सेस, 58 वॉर्डबॉय व स्वीपर्स असा कर्मचारीवर्ग उपलब्ध आहे. सध्या शहर परिसरातील उद्योग बंद असल्याने या रुग्णालयात आजची अंतररुग्ण संख्या केवळ 6 आहे.
स्वतंत्र इमारत व सुरक्षित व्यवस्था या ठिकाणी असल्याने हे रुग्णालय महापालिकेने करोना रुग्णांवर उपचारासाठी तात्पुरते ताब्यात घेऊन या ठिकाणी करोना रुग्णावर उपचार करावेत. या रुग्णालयात मोठा कर्मचारी वर्ग असून उपलब्ध साधनसामग्रीचा चांगला उपयोग होणार असून शहराची आरोग्य सुविधा मजबूत होण्यास मदत होणार आहे.