महाराष्ट्र राज्य केशशिल्प मंडळाची अखेर स्थापना

महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या मागणीला यश : अध्यक्षपदी सुधीर राऊत यांची नियुक्ती

पुसेसावळी  – गेल्या कित्येक वर्षांपासून नाभिक समाजाच्या मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्यापैकीच एक प्रमुख मागणी देशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही नाभिक समाजाच्या विकासासाठी महाराष्ट्र केशशिल्प मंडळाची स्थापना करावी त्यावर नाभिक समाजातीलच व्यक्तीची नेमणूक करुन राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात यावा ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केली असुन राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य केशशिल्प मंडळ स्थापनेचा आदेश निर्गमित केला आहे.

महाराष्ट्र नाभिक महामंडळ गेल्या कित्येक वर्षांपासुन भगवानराव बिडवे, दत्ताजी अनारसे यांच्या नेतृत्वाखाली नाभिक समाजाच्या विविध मागण्यांसाठी शासन स्तरावर विविध मोर्चे, अधिवेशने, बैठका या माध्यमातून केंद्र शासनाच्या शिफारशीनुसार नाभिक समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा, प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जीवा महाले स्मारक व्हावे, समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी केशशिल्प बोर्डाची स्थापना अशा विविध मागण्यासाठी शासन दरबारी लढा देत आहे.

त्याचीच परिपूर्ती म्हणून राज्य सरकारने केशशिल्प महामंडळाची मागणी मान्य करुन त्याबाबतचा शासन आदेश निर्गमित केला आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रांत उपाध्यक्ष, नागपूर महानगरपालिका माजी स्थायी समिती सभापती सुधीर राऊत यांची मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय महामंडळाच्या अधिपत्याखाली या मंडळाचे काम चालणार असून याअंतर्गत सलून व्यावसायिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी मदत करणे, पारंपरिक व्यवसाय आधुनिक पध्दतीने विकसित करण्यासाठी प्रशिक्षण देणे ही कामे प्राधान्याने या मंडळामार्फत करण्यात येणार आहेत. केशशिल्प मंडळाच्या स्थापनेबद्दल नाभिक समाजबांधवांकडून राज्य सरकारचे अभिनंदन करण्यात येत असुन नाभिक समाजाच्या इतरही मागण्या प्राधान्यक्रमाने मंजूर कराव्यात अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.

नाभिक समाजाच्या न्याय हक्कासाठी गेल्या अनेक वर्षांपासुन स्व. हणमंतराव साळुंखे, ना. संगमवार यांचे प्रबोधन, साहित्यिक शशिकांत चव्हाण यांनी लेखनीतुन, भगवानराव बिडवे यांनी विविध मोर्चे,अधिवेशने या माध्यमातून लढा उभारला. दत्ताजी अनारसे, प्रभाकर फुलबांधे यांनी साथ देवून संपूर्ण महाराष्ट्रात लढा उभारला. त्यामुळेच शासनाने याची दखल घेऊन केशशिल्प महामंडळ स्थापन केले.

सामूहिक प्रयत्नाला अखेर यश…
नाभिक समाजाच्या गेल्या अनेक वर्षांपासूनची केशशिल्प महामंडळ स्थापन करण्याची मागणी राज्य सरकारने मान्य केली त्याबद्दल सरकारचे धन्यवाद, केंद्र सरकार शिफारशीनुसार नाभिक समाजाचा अनुसूचित जातीत समावेश, जीवा महाले स्मारक व इतर मागण्यांचा शासन दरबारी पाठपुरावा सुरु असून लवकरच त्यामध्येही निश्‍चितच यश येईल.

भगवानराव बिडवे, राष्ट्रीय नाभिक महासंघ

केशशिल्प महामंडळाच्या माध्यमातून सरकारने नाभिक समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला असून नाभिक समाजाची अनेक वर्षांपासूनची मागणी मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली. या केशशिल्प महामंडळाच्या माध्यमातून सलून व्यावसायिकांना अत्याधुनिक प्रशिक्षण तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज पुरवठा उपलब्ध करुन दिला जाईल.

ना. सुधीर राऊत, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य केशशिल्प महामंडळ

Leave A Reply

Your email address will not be published.