माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांची “हायकमांड’कडे धाव
पुणे -“हडपसर मतदारसंघात कॉंग्रसची परंपरागत ताकद असून हा कॉंग्रेसकडेच राहावा,’ अशी मागणी या मतदारसंघाचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी थेट पक्षाध्यक्ष सोनिया गांधी तसेच राहूल गांधी यांना पत्र पाठविले आहे. दरम्यान, याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच कॉंग्रेसनेही सावध भूमिका घेतली आहे. तर, दुसऱ्या बाजूला ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला आहे.
विधानसभेसाठी पुण्यातील जागा वाटपांसाठी आघाडीच्या बैठकांचे सत्र सुरू आहेत. त्यात वडगाव शेरी, हडपसर आणि खडकवासला राष्ट्रवादीला देण्याचे निश्चित झाले असून कसबा, कॅन्टोंन्मेंट तसेच शिवाजीनगर कॉंग्रेसकडे असणार आहे. तर, पर्वती आणि कोथरुडच्या जागेबाबत दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू असून अंतिम निर्णय झालेला नाही. आता हडपसरमधील कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून हडपसर कॉंग्रेसकडे घेण्याची मागणी केल्याने नवीन चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या मागणीच्या अनुषंगाने शक्ती प्रदर्शनासाठी हडपसर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीने शनिवारी सायंकाळी 5 वाजता मेळावाही आयोजित केला आहे.
काय आहे शिवरकर यांची मागणी
“हडपसर विधानसभा मतदारसंघ शिरूर लोकसभेत येतो. शिरूर लोकसभेतील 6 विधानसभा मतदारसंघांपैकी हडपसरसह किमान 2 मतदारसंघ कॉंग्रेसच्या वाट्याला यावेत. या मतदारसंघात पक्षाला जनसमर्थन आणि कार्यकर्त्यांचे जाळे आहे. त्यामुळे हडपसर कॉंग्रेसकडे राहिल्यास त्याचा अनुकूल परिणाम पक्षाच्या वाढीवर होणार आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत हा मतदारसंघ सोडू नये,’ अशी मागणी शिवरकर यांनी केली आहे.
आघाडीचा निर्णय वरिष्ठांचा आहे. कार्यकर्त्यांच्या मागणीचाही आदर असून पक्ष घेईल तो निर्णय अंतिम असेल. त्यानुसार भाजपला रोखण्यासाठी एकत्र प्रयत्न केले जातील.
– रमेश बागवे, शहराध्यक्ष, कॉंग्रेस.
आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येत आहे. शहरातील कोणताही मतदारसंघ कोणाच्याही वाटयाला गेला तरी, आघाडीधर्माचे पालन करून त्यानुसार दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारात आम्ही उतरणार आहोत. त्यामुळे तूर्तास यावर भाष्य करणे योग्य होणार नाही. ही निवडणूक दोन्ही पक्ष आघाडी म्हणूनच लढविणार आहोत.
– चेतन तुपे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस