सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा घाटात चालत्या कारने पेट घेतला. या दुर्दैवी घटनेत कारसह कारचालक जळून खाक झाला. कारला आग लागल्यानंतर चालकाला बाहेर पडणं शक्य न झाल्याने त्याचा जळून मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्टिगा कार गुरुवारी कोल्हापूरहून कणकवलीच्या दिशेने येत होती. यावेळी कारने अचानक पेट घेतला. अचानक घडलेल्या घटनेने चालकाला कारमधून बाहेर पडता आले नाही. दुर्दैवाने चालकाचा कारमध्येच जळून मृत्यू झाला. कारमध्ये चालकाच्या जागी अक्षरशः मानवी सांगाडा शिल्लक राहिला होता. मृतदेह पूर्णतः जळाला असल्याने त्याची ओळख पटू शकली नव्हती.
कारचा क्रमांक एमएच 07 एजी 6297 असून ती कणकवली येथील व्यावसायिक निलेश काणेकर यांच्या मालकीची असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचे शेवटचे लोकेशन अपघाताच्या ठिकाणी मिळाल्याने तेच कार चालवत असल्याची भीती व्यक्त होते आहे. त्यांचा मोबाईल सध्या बंद येत आहे. डीएनएमध्येच सर्व माहिती स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.