कृष्णा पाणी वाटप – येडीयुरप्पा व देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत एकमत
मुंबई: तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतर कृष्णा नदीच्या पाणी वाटपाचे फेरनियोजन व्हावे, अशी मागणी करत कृष्णा पाणी वाटप लवादाकडे फेरयाचिका दाखल करणार्या आंध्र प्रदेश राज्याच्या भूमिकेला महाराष्ट्र-कर्नाटक राज्य संयुक्तपणे विरोध करणार आहेत. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्यात एकमत झाले आहे.
कृष्णा लवादाने तत्कालिन आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या दरम्यान पाणी वाटपावर निर्णय दिला आहे. तथापि आंध्र प्रदेशने आता तेलंगणा राज्य निर्मितीनंतर पाण्याचे फेर नियोजन व्हावे अशी भूमिका घेतली आहे. त्यासाठी याचिका दाखल केली आहे. त्यापार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. लवादाने तत्कालिन संयुक्त आंध्र प्रदेशसाठी निर्णय दिला आहे. त्यामुळे त्याच्या वाट्याला आलेल्या पाण्याच्या वाटपाबाबत आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांनी दोहोतच तोडगा काढणे अपेक्षित आहे. त्यामुळे लवादाला आव्हान देण्याच्या आंध्र प्रदेशच्या भुमिकेला महाराष्ट्र आणि कर्नाटक यांनी संयुक्तपणे विरोध करण्याचा निर्णयावर दोन्ही राज्यांत एकमत झाले आहे. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डॉ. अश्वतनारायण, गृहमंत्री बसवराज बोम्मई, येडियुरप्पा यांचे चिरंजीव खासदार राघवेंद्र आदी उपस्थित होते.
पूर व्यवस्थापनासाठी दोन्ही राज्यांची उच्चस्तरीय समिती
देवेंद्र फडणवीस व येडियुरप्पा यांच्यात यावेळी झालेल्या चर्चेत दोन्ही राज्यांतील पूर आपत्तीच्या व्यवस्थापनासाठी संयुक्त उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीच्या माध्यमातून दोन्ही राज्यांतील धरणांच्या पाण्याबाबत नियोजन करण्यात येईल आणि समन्वय राखण्यात येणार आहे. या चर्चेनंतर येडियुरप्पा आणि मान्यवरांनी वर्षा निवासस्थानी प्रतिष्ठापीत गणेशाचेही दर्शन घेतले.