मुंबई :- महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या निवडीची घोषणा विधानसभेत केली.
विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या अभिनंदन प्रस्तावावर विधानसभा सदस्य बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, भास्कर जाधव, कालिदास कोळंबकर, नाना पटोले आदींची भाषणे झाली. सर्वांनी या निवडीबद्दल वडेट्टीवार यांचे अभिनंदन केले.
त्यानंतर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, आपण मोठ्या संघर्षातून या पदापर्यंत पोहोचलो आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण मला आहे. केवळ राजकारणाच्या भावनेतून कोणत्याही प्रश्नाकडे न पाहता त्यातून सामान्य माणसाला न्याय मिळेल, यासाठी कायम कार्यरत राहू. त्यांच्या प्रश्नांसाठी कायम आवाज उठवू, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अभिनंदनपर प्रस्तावाला उत्तर दिले.
यावेळी ते म्हणाले की, जीवनाच्या सुरुवातीच्या काळात संघर्ष पाहिला. त्यानंतर जी वाटचाल झाली, त्यातून सामान्य माणसांचे प्रश्न धसास लावले. कधी सत्ताधारी म्हणून, तर कधी विरोधी पक्षाच्या बाकांवर बसून सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याचे काम केले. या पदावर असताना ती जबाबदारी अधिक निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निश्चितपणे प्रयत्न करु, असे यावेळी त्यांनी सांगितले.