राज्यपाल कोश्यारींना विमानातून खाली का उतरवलं ?, मुख्यमंत्री कार्यालयानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी नाकारली आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांसह अनेकांनी राज्य सरकारवर सडकून टीका केलीय. या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्टीकरण दिले आहे.

“राजभवन सचिवालयाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दौऱ्याअगोदर त्यांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किवा नाही याची खातरजमा करून घ्यायला हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही”, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विमानातून उतरवल्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केलीय. राज्यपालांना विमान नाकारणं हा दुर्दैवी प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माझ्या माहितीप्रमाणे जीएडीला पत्र दिले होते. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाकडे हे पत्र पोहोचलं होतं पण तरीही परवानगी नाकारली. महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासात एवढं इगो असणारं सरकार मी पाहिलं नाही, आपण कोणाचा अपमान करतो आहोत, हे कळाले पाहिजे. राज्यपाल हे संविधानिक पद आहे, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली.

स्पाईसजेटमध्ये करावं लागलं बुकिंग –

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मसूरी येथे आयएएस अॅकॅडमीत होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जायचे होते. प्रोटोकाॅलनुसार त्यांना सरकारी विमानातून जायचे होते. मात्र, राज्य सरकारकडून परवानगी न मिळाल्याने कोश्यारी यांना विमानात बसल्यानंतरही खाली उतरावे लागले. यानंतर त्यांनी स्पाईसजेटच्या 12:30 वाजताच्या विमानाचे बुकिंग केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.