“महानंद’ करणार अतिरिक्‍त दूध संकलन, वितरण शासनाने सोपवलेली जबाबदारी पूर्ण करणार – डी. के. पवार

फलटण (प्रतिनिधी) –अतिरिक्त दूध संकलन, प्रक्रिया व वितरणाची शासनाने सोपविलेली जबाबदारी “महानंद’ यशस्वीरीत्या पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे उपाध्यक्ष डी. के. पवार यांनी केले.

पवार म्हणाले, लॉकडाऊनमुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीत अतिरिक्त दुधाच्या नियोजनासाठी प्रतिदिन दहा लाख लिटर मर्यादेत दूध स्वीकृती करण्यात आली होती. त्याच धर्तीवर आता 1 सप्टेंबर ते 31 ऑक्‍टोबर या कालावधीत दूध संकलन, प्रक्रिया व वितरणाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघावर (महानंद) सोपविण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत सप्टेंबर व ऑक्‍टोबर या दोन महिन्यांमध्ये प्रतिदिन दहा लाख लिटर याप्रमाणे सहा कोटी दहा लाख लिटर दूध संकलन अपेक्षित असून त्याचे दूध भुकटी व बटरमध्ये रूपांतर करण्याची जबाबदारी शासनाने 27 ऑगस्टच्या निर्णयाद्वारे “महानंद’वर सोपवली आहे. त्यासाठी 198 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून मुंबई येथे प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन महिन्यांमध्ये संकलित होणाऱ्या दुधावरील प्रक्रियेतून 4421 मेट्रिक टन दूध भुकटीचे उत्पादन होणार असून या भुकटीचे पॅकिंग व वितरणाची जबाबदारी महानंदवर सोपविली आहे.

ही भुकटी आदिवासी विकास विभागाच्या “भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनें’तर्गत सहा लाख 51 हजार विद्यार्थ्यांना प्रतिदिन, प्रतिविद्यार्थी 18 ग्रॅम, एक लाख 21 हजार गरोदर महिला व स्तनदा मातांना प्रतिदिन 25 ग्रॅम याप्रमाणे वर्षभर उपलब्ध करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेनुसार एक वर्षाकरिता पॅकिंग लॉससह 5750 मेट्रिक टन भुकटी लागणार असून त्यासाठी 97 कोटी 75 लाख रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे.

संकलन, प्रक्रिया, पॅकिंग, वितरण, वाहतूक खर्चास मान्यता देऊन शासनाने पॅकिंगसाठी आठ कोटी 62 लाख, दूध भुकटीच्या वाहतुकीसाठी नऊ कोटी 14 लाख रुपयांची तरतूद केली असून पॅकिंग सुरू झाली आहे. ही दूध भुकटी दरमहा, प्रतिविद्यार्थी 250 ग्रॅमची दोन पाकिटे व महिलांसाठी दरमहा, तीन पाकिटे देण्यात येणार आहे. ही पाकिटे संबंधित जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (बालकल्याण) सुपुर्द करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

अतिरिक्त दुधाच्या नियोजनास 31 ऑक्‍टोबरपर्यंत मुदतवाढ देऊन त्याची जबाबदारी महानंदवर सोपविल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, दुग्धविकास मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे महानंदचे अध्यक्ष रणजित देशमुख व संचालकांनी आभार मानले. ना. सुनील केदार यांनी महानंदला भेट दिली, असे पवार यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.