लॉकडाऊनमध्ये शेतकरी आणखी अडचणीत सापडणार
सोमवारपासून खरेदी बंद
कात्रज (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाने सोमवार (दि.27) पासून पावडर तयार करण्यासाठी अतिरिक्त दूध स्वीकारणार नसल्याचे कळवले आहे. त्यामुळे नाईलाजाने दूध व्यावसायिकांना एक दिवसाआड दूध खरेदी बंद करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे कात्रज दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी सांगितले.
करोना विषाणू संसर्गामुळे एकूणच सर्व अर्थकारण बिघडले असून सर्वसामान्य शेतकरी अडचणीत आला आहे. अशातच राज्य शासनाने अतिरिक्त होणाऱ्या दुधापैकी प्रतिदिन 10 लाख लिटर दुधाची महासंघामार्फत पावडर करण्याची योजना तीन महिन्यांकरिताच राबवली. तथापि राज्य शासनाने ही योजना डिसेंबर अखेरपर्यंत राबवणे आवश्यक आहे. दूध खरेदी अनुदानाचा निर्णय झाल्यावर या योजनेचा फेरविचार करावा. परंतु, सद्यपरिस्थितीत शासनाने अतिरिक्त होत असलेल्या दुधाची खरेदी सुरू ठेवावी. अन्यथा दुधाचे दर कोसळतील व आधीच संकटात सापडलेल्या राज्यातील दूध व्यवसाय व त्यावर अवलंबून असलेले कोट्यवधी दूध उत्पादक शेतकरी अडचणीत येतील, अशी चिंताही म्हस्के यांनी व्यक्त केली आहे.
शेतकरी आणखी अडचणीत…
लॉकडाऊनमुळे दूध विक्रीमध्ये घट झाली आहे. सहकारी व खासगी दूध संस्थेमार्फत तयार करण्यात येणाऱ्या दूध पावडर व बटरची मागणी कमी झाली असून दूध पावडर उत्पादकांनी दूध खरेदी कमी केली आहे. पावडर व बटरचा अतिरिक्त साठा पडून आहे. त्यामध्येच केंद्र शासनाने दहा हजार टन दूध भुकटी आयातीचा निर्णय घेतला आहे. अनेक ठिकाणी गाय दुधाची खरेदी कमी झाली आहे, त्याच बरोबर इंधनाचे व पशुखाद्याचे वाढते दर, यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे.