भोपाळ – कॉंग्रेसच्या मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांचा मोबाइल फोन दोन फसवणूक करणाऱ्यांनी हॅक केला आणि पक्षाच्या चार नेत्यांकडे प्रत्येकी 10 लाख रुपयांची मागणी केली. पक्षाच्या प्रवक्त्याने सांगितले की, कॉंग्रेसच्या अधिकाऱ्यांनी कथितपणे कॉल करणाऱ्या दोन लोकांना पकडले आहे. फसवणूक करणारे दोघेही गुजरातचे रहिवासी असून, त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली, मात्र कोणतीही औपचारिक तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. मध्य प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष केके मिश्रा यांनी सांगितले की, तरुणांनी कमल नाथ यांचा फोन हॅक केला आणि आमदार सतीश सिकरवार, खजिनदार अशोक सिंग, कॉंग्रेसच्या इंदूर शहर युनिटचे अध्यक्ष सुरजित सिंग चढ्ढा आणि माजी कोषाध्यक्ष गोविंद गोयल यांच्याकडून प्रत्येकी 10 लाख रुपयांची मागणी केली. गोयल आणि काही पदाधिकाऱ्यांनी कॉल डिटेल्स तपासले तेव्हा फसवणूक उघडकीस आली. माजी मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या सदस्यांकडून पैसे मागितले नसल्याचेही स्पष्ट झाले.
त्यानंतर गोयल यांनी फसवणूक करणाऱ्यांना पकडण्याचा निर्णय घेतला आणि पैसे गोळा करण्यासाठी तरुणांना आपल्या कार्यालयात बोलावले. गोयल यांच्या कार्यालयात पैसे घेण्यासाठी आलेल्या 25 आणि 28 वर्षांच्या दोघांनाही कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी लवकरच रीतसर पोलिस तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे, परंतु कोणतीही अधिकृत तक्रार आलेली नाही.