भोपाळ – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या एक व्यक्ती एक पद या घोरणातून त्यांनी विधानसभेतील पक्षनेतेपद त्यागलं आहे. कमलनाथ यांच्याकडे विधिमंडळ पक्षनेतेपद तसेच मध्यप्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी होती. कमलनाथ यांनी विधिमंडळ पक्षनेतेपद सोडलं असून यापुढे ते प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळतील.
दरम्यान, कमलनाथ यांच्या राजीनाम्यानंतर पक्षनेतेपदाच्या रिक्त जागेवर गोविंद सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोविंद सिंग हे माजी मंत्री राहिले असून ते ७ वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत.
2023 मध्ये मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी कमलनाथ यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “काँग्रेस अध्यक्ष (सोनिया गांधी) यांनी तुमचा काँग्रेस विधिमंडळ पक्ष (CLP) मध्य प्रदेशच्या नेतेपदाचा राजीनामा तत्काळ प्रभावाने स्वीकारला आहे.”
यासोबतच सोनिया गांधी यांनी गोविंद सिंग यांची काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नवे नेते म्हणून नियुक्ती केल्याचेही पत्रात म्हटले आहे. गोविंद सिंग हे भिंड जिल्ह्यातील लाहारमधून विधानसभेचे सदस्य आहेत.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजयी झाल्यापासून प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.