अंबाबाई मंदिरातील मनकर्णिका कुंडात सापडली ‘मेड इन जर्मन’ रिव्हॉल्व्हर

कोल्हापूर  – करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर आत परिसरात असणाऱ्या मनकर्णिका कुंडाचे उत्खनन गेल्या आठ महिन्यांपासून सुरू आहे या उत्खननात अक्षरशः पुरातन वस्तूंचा खजिना सापडला आहे. अवघ्या सहा ते सात इंच लांबीची ‘मेड इन जर्मन’ रिव्हॉल्व्हर, एक जिवंत काडतूस, आठ बुलेटचा संच, 135 दुर्मीळ नाणी, प्राचिन मूर्ती, काचेच्या वस्तू आदी 457 वस्तू करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या आवारातील कुंडाच्या उत्खनात सापडल्या आहेत. अजूनही उत्खनन सुरू आहे, त्यातही आणखी काही वस्तू आढळून येतील, या वस्तूंचे संग्रहालय करण्याचा विचार असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.

तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी 2013 मध्ये पुरातत्वशी जे जे सुसंगत आहे, ते पुनर्जिवीत करा, जे जे विसंगत आहे, ते दूर करा असे आदेश दिले होते. त्यानंतर सुमारे 65 वर्षांपूर्वी बुजविण्यात आलेला मनकर्णिका कुंड खुला करण्याचा निर्णय घेतला होता. ही जागा महापालिकेच्या ताब्यात होती, ती जानेवारी 2020 मध्ये महापालिकेने देवस्थानला हस्तांतरीत केली. त्यानंतर जून 2020 पासून या कुडांचे उत्खनन करण्याचे काम सुरू आहे. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानूसार पारंपरिक पद्धतीने उत्खनन केले जात असल्याचे जाधव यांनी सांगितले.

हा कूंड 60 बाय 60 फूट असा आहे. कुंडात उतरण्यासाठी दक्षिण आणि उत्तर बाजूने पायऱ्यांच्या दोन वाटा आहेत. या कुंडात 50 विरगळ आहेत तर पाच ओवऱ्या असल्याचे आतापर्यंतच्या उत्खननात आढळून आले आहे. कुंडाच्या चारही बाजूला शिवलिंग आहे. सुमारे 16 पाण्याचे झरे आढळले आहेत. आतापर्यंत साडे दहा मीटर पर्यंतचा गाळ काढलेला आहे, अजूनही तळ लागलेला नाही. सुमारे अडीच ते तीन फुटापर्यंत आणखी खाली गेल्यास तळ लागेल अशी शक्‍यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

काचेचा कंदिल सुस्थितीत
या उत्खननात आतापर्यंत सुमारे 457 वस्तू आढळल्या आहेत. त्यात अंगावर पाच ठिकाणी शिवलिंग असलेली आणि घोड्यावर बसलेल्या पार्वतीची पितळेची दुर्मीळ मूर्ती आहे. मातीच्या सुमारे 25 विविध मूर्त्या आहेत. बौध्द किंवा जैन धर्माशी प्रथमदर्शनी साधर्म्य असलेली आणि केवळ चेहरा असलेली एक दगडी मूर्ती आहे. या उत्खननात काचेचा एक कंदिल आढळला. वैशिष्ट्‌य म्हणजे काचेचा हा कंदिल पूर्ण सुरक्षित असून काचेवर साधा ओरखडाही पडलेला नाही. अशीच छोटी गणपतीची मूर्तीही आहे. काही टाक आहेत तर सुमारे 135 तांब्यांची नाणी आहेत. पितळेची टॉर्च, डबे, पेले अशाही वस्तू सापडल्या आहेत. तसेच आठ बुलेटचा संच, एक जिवंत छोटी बुलेट आणि काळ्या रंगाची मेड इन जर्मनी असा उल्लेख असलेली सहा सात इंचाची छोटी पण चालू असलेली रिव्हॉल्वर आढळून आली आहे. उत्खननादरम्यान काढण्यात येणारी मातीही जतन केली जात आहे. ती वाळवून, चाळून घेतली जाणार आहे. त्यातही काही गोष्टी आढळण्याची शक्‍यता असल्याचे सांगत यासर्व वस्तूचे भाविकांसाठी संग्रहालय करण्याचा विचार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.