- कार्ला प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन
मळवली – कार्ला प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी (दि. 8) जिल्हा परिषद सदस्य कुसूम काशिकर, पंचायत समिती सदस्य महादू उघडे, राजश्री राऊत, माजी पंचायत समिती सदस्य दीपक हुलावळे, सरंपच दीपक काशिकर, उपसरपंच पूनम येवले, जितेंद्र बोत्रे, बाळासाहेब भानुसघरे, भरत येवले, मारुती देशमुख, किसन आहेर, अनंता शिंदे, दीपाली विकारी परिसरातील नऊ गावांमधील सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते वाकसई येथे करण्यात आले.
वाकसई, देवघर, करंडोली, जेवरेवाडी, कार्ला, वेहेरगाव, दहिवली व शिलाटणे, मळवली या नऊ गावांकरिता 30 वर्षांपूर्वी कार्ला प्रादेशिक पाणी पुरवठा योजना करण्यात आली होती. 2006 साली या योजनेला कालावधी संपल्यापासून नवीन योजनेसाठी सर्वच ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व लोकप्रतिनिधी पाठपुरावा करत होते.
तब्बल 15 वर्षांनंतर या योजनेच्या नुतनीकरणाला निधी उपलब्ध झाला आहे. या योजनेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन वाकसई जिल्हा परिषद शाळेलगत करण्यात आले. सुमारे 14 कोटी रुपयांची ही योजना असून, नऊही गावांचा वाढलेला विस्तार, लोकसंख्या व पुढील 25 वर्षांत अंदाजित वाढणारी लोकसंख्या विचारात घेऊन हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. 3 एमएलडी क्षमता असलेल्या या प्रकल्पाचे काम दीड वर्षात पूर्ण होईल, असे यावेळी ठेकेदाराच्या वतीने सांगण्यात आले.
ज्याठिकाणी हा प्रकल्प होणार आहे. त्या वाकसई ग्रामपंचायत गावठाणाच्या जागेत एक जुने बांधकामांचे फाऊंडेशन असल्याने त्या व्यक्तीकडून कामासाठी विरोध होत होता. याकरिता पोलीस बंदोबस्तात कामाला सुरूवात करण्यात आली, तसेच सामोपचाराने ही जागा त्या व्यक्तीकरिता सोडण्यात आली आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विविध गावातील महिला प्रतिनिधीच्या हस्ते या पाणी योजनेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. विद्यमान आमदार सुनील शेळके व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे या दोघांनी ही योजना मंजूर व्हावी याकरिता मंत्रालयात पाठपुरावा केल्याने दोन्ही आजी- माजी आमदारांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले. या वेळी या योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध गावातील नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.