पिंपरी – गुजरातच्या सुरतमधून आणलेल्या फुफ्फुसांनी शहरातील एका महिलेला जीवनदान दिले. ग्रीन कॉरिडोरद्वारे अवघ्या सव्वा दोन तासांमध्ये साडे चारशे किलोमीटरहून अधिक अंतर कापत फुफ्फुसे शहरात आणण्यात आली.
पिंपरी येथील डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वी पार पडले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहाय्याने ही शस्त्रक्रिया पार पडली. संबंधित रुग्णासाठी सुरतहून पुण्याला चार्टर विमानाने फुफ्फुसे आणण्यात आले होते. दुसऱ्या राज्यातून पुण्यामध्ये हवाईमार्गे फुफ्फुसे आणून यशस्वी प्रत्यारोपण करण्याची शहरातील ही पहिलीच घटना असल्याचा दावा हॉस्पिटल प्रशासनाने केला आहे.
जिल्हा रुग्णालय सुरत ते सुरत विमानतळ आणि नंतर पुणे विमानतळ ते डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या मार्गे ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आले होते. हे अवयव एका 53 वर्षीय महिलेवर प्रत्यारोपित करण्यात आले आहे. कबूतरांच्या संपर्कात आल्याने तीव्र फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होती. रुग्णाला 20 सप्टेंबर 2023 रोजी डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे येथे अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तिला श्वासोच्छवासामध्ये अडथळा निर्माण झाल्याने व्हेंटिलेटरची आवश्यकता भासू लागली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रुग्णाची प्रकृती खालावत चालली होती आणि त्यांचे नाव दुहेरी फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी अवयव प्राप्तीच्या प्रतीक्षा यादीत नोंदविले होते. सुरत जिल्हा रुग्णालयामध्ये 42 वर्षीय मेंदूमृत पुरुषाच्या नातेवाइकांनी अवयवदानाचा स्तुत्य निर्णय घेतला. अवयवदानाच्या सहमतीने पुढील प्रक्रिया करण्यात आली. सुरतच्या जिल्हा रुग्णालयामधून 2 तास 15 मिनिटांत डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे येथे सुखरूप आणण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य सेवा कर्मचार्यांच्या संपूर्ण टीमच्या अथक प्रयत्नामुळे अवयव आणण्याची प्रक्रिया यशस्वी पार पडल्याची माहिती, रुग्णालय प्रशासनाने दिली. प्रत्यारोपणानंतर रुग्णाने अवयवाला चांगला प्रतिसाद दिला असून त्यांना लवकरच घरी सोडण्यात येईल, अशी माहिती रुग्णालयाने दिली.