राहू- दौंड राहू बेट परिसरात सध्या लम्पी आजाराने पुन्हा डोके वर काढलेले दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे बेट परिसरातील पशुपालक चिंतेत आहेत. बेटात अनेक गावांतील जनावरांमध्ये लम्पी आजार आढळून आला आहे.
आधीच महागाई मोठ्या प्रमाणात झाली आहे. शासनाने जाहीर केलेला 34 रुपये दर हा तांत्रिक अडचणीत अडकला आहे. त्यामुळे विशेषतः दूध उत्पादक शेतकऱ्यांचे औषधावर मोठ्या प्रमाणावर खर्च होताना दिसत आहे. यासाठी शेतकऱ्याने विलीगीकरणासारखी प्रक्रिया अवलंबणे आवश्यक आहे.
लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश व म्हैशींना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. त्यामुळे पशुपालकांनी जनावरांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. बेट परिसरात याचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. लम्पी स्कीन हा पशुधनातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी पशूधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. पशुपालकांनी सतर्क राहून काळजी घेण्याची आवश्यकता आहे. जनावरांची वेळीच काळजी घेतल्यास आपल्या जनावराला लम्पी आजारा लागण होण्यापासून वाचवता येते.
“देशी जनावरांमध्ये अधिक प्रादुर्भाव होत असतो म्हणून त्यांची विशेष काळजी घ्यावी. लसीकरण हाच प्रभावी उपाय असल्याने त्याचे महत्व लक्षात घेऊन सर्वांनी सहभाग नोंदविण्याची गरज आहे.” – डॉ. हृषिकेश शिंदे, पशुधन विकास अधिकारी, वडगाव बांडे.