वाघोली – पर्वती पुणे येथील नवनाथ मित्र मंडळ ट्रस्ट अरुणोदय सोसायटीच्या वतीने वाघोली (ता. हवेली) येथील लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेतील विशेष मुलांसाठी अन्नधान्य व शैक्षणिक साहित्य ,प्रदान करत मदतीचा हात देण्यात आला, यावेळी अरुणोदय सोसायटीतील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते मंगळवारी (दि. ६) देण्यात आले. दरम्यान मंडळाच्या वतीने विशेष अंध व अपंग मुलांना गणपतीची आरती करण्याचा मान देण्यात आला. यावेळी विशेष मुले भारावून गेली.
पर्वती पुणे येथील नवनाथ मित्र मंडळ गेल्या पंधरा वर्षांपासून विविध सामाजिक संस्थांना अन्नदान, शैक्षणिक साहित्य, संगणक वाटप असे उपक्रम राबवत असते. संस्थेचे हे अन्नदान उपक्रमाचे सोळावे वर्ष आहे. यावेळी लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेचे अध्यक्ष अर्जुन केंद्रे यांच्याकडे विशेष मुले व अरुणोदय सोसायटीतील रहिवाशी यांच्या उपस्थितीत आठशे किलो अन्नधान्य व शैक्षणिक साहित्य सुपूर्द करण्यात आले. यावेळी सर्व विशेष मुलांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.