मुंबई – महंमद शमीच्या अफलातून गोलंदाजीमुळे एकवेळ 4 बाद 29 अशा बिकट स्थितीत फसलेल्या लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल स्पर्धेतील सामन्यात गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी 159 धावा करण्याचे आव्हान ठेवले. संघाला संकटातून बाहेर काढताना अनुभवी दीपक हुडा व पदार्पणवीर आयुष बदोनी यांनी जिद्दी खेळ करत अर्धशतके फटकावली व संघाला 20 षटकांत 6 बाद 158 अशी सुस्थिती प्राप्त करुन दिली.
– लोकेश राहुल पहिल्याच चेंडूवर बाद
– स्पर्धेतील महागड्या खेळाडूला शमीने परतवले
– डीकॉक, लेविस व पांडे अपयशी
– शमीचे महत्त्वपूर्ण 3 बळी
– बदोनीचे पदार्पणातच अर्धशतक
– लखनौच्या डावात 17 चौकार व 5 षटकार
गुजरातचा कर्णधार हार्दीक पंड्याने नाणेफेक जिंकत लखनौला पहिल्यांदा फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय अनुभवी वेगवान गोलंदाज महंमद शमीने सार्थ ठरवला व लखनौचा कर्णधार लेकेश राहुलला सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद केले व थाटात सुरुवात केली. या धक्क्यातून लखनौचा संघ पहिल्या पाच षटकांत सावरलाच नाही.
पाच षटकांचा खेळ होइपर्यंत लखनौने केवळ 29 धावांत पाच फलंदाज गमावले होते. त्यानंतर मात्र, हुडाने आपला अनुभव पणाला लावताना आक्रमक फलंदाजी केली. त्याने बदोनीसह पाचव्या गड्यासाठी 87 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली व संघाचे शतक फलकावर लावले. हुडा 55 धावांची खेळी करुन बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 41 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व 2 षटकार फटकावले.
बदोनीनेही अर्धशतकी खेळी करताना 41 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारांची आतषबाजी करत 54 धावा केल्या. त्याने कृणाल पंड्याला हाताशी घेत संघाला दीडशतकी मजल मारुन दिली. पंड्यानेही जबाबदारीने खेळी करत नाबाद 21 धावा केल्या. गुजरातकडून महंमद शमीने 3 गडी बाद केले. वरुण ऍरॉनने 2 तर रशीद खानने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक –
लखनौ सुपर जायंट्स – 20 षटकांत 6 बाद 158 धावा. (दीपक हुडा 55, आयुष बदोनी 54, कृणाल पंड्या नाबाद 21, महंमद शमी 3-25, वरुण ऍरॉन 2-45, रशीद खान 1-27).