नवी दिल्ली – उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या ग्रामीण भागातील काकोरी येथे शॉर्ट सर्किटमुळे दोन गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन लहान मुली आणि एका महिलेचाही समावेश आहे.
अन्य चार जण या घटनेत जखमी झाले आहेत. दोन मजली इमारतीला आग लागल्यानंतर लगेचच हे स्फोट झाले. हाता हजरत साहब भागात ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
काल रात्री साडेदहाच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली व पाठोपाठ स्फोट झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींवर योग्य ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. मुशीर (वय ५०), त्याची पत्नी हुस्ना बानो (४५), भाची राइया (५), हिबा (२) आणि हुमा (३) ही मृतांची नावे आहेत.