नवी दिल्ली – दिल्लीच्या कोर्टात नुकताच जो कमी तीव्रतेचा स्फोट झाला, तो स्फोट डीआरडीओच्या संरक्षण वैज्ञानिकानेच घडवल्याची बाब समोर आली आहे. आपल्या एका शेजारी राहणाऱ्या इसमाला धडा शिकवण्यासाठी त्याने हा प्रकार केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
भारत भुषण कटारिया असे या वैज्ञानिकाचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून बॉम्ब तयार करण्याची स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश आस्थाना यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की, रोहिणी कोर्टात त्या दिवशी आलेली एक हजार वाहने आणि त्या परिसरात लावण्यात आलेल्या एक हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रिकरण आम्ही तपासले. आणि त्यातून आम्ही आरोपीपर्यंत पोहचलो असे ते म्हणाले. त्या दिवशी कोर्टात झालेल्या विविध सुनावण्या आणि कोर्टात आलेल्या प्रत्येक इसमाबाबत माहिती घेऊन आम्ही आरोपीपर्यंत पोहचलो असेही त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले की, या स्फोटासाठी अमोनियम नायट्रेट वापरण्यात आले आणि ते बाजारात सहज उपलब्ध असते. या स्फोटासाठी स्फोटके आणि डिटोनेटर्स यांचा वापर केला गेला होता. पण प्रत्यक्षात केवळ डिटोनेटरचाच स्फोट झाला पण स्फोटके उडालीच नाहीत. अन्यथा मोठा स्फोट झाला असता असे ते म्हणाले.
या स्फोटासाठी जी लॅपटॉप बॅग वापरण्यात आली होती, त्यावर मुंबईच्या कंपनीचा लोगो होता व त्यांचे दिल्लीत गोडाऊन आहे. या कंपनीनेही आम्हाला तपास कामात मदत केली. वकिलाचा वेष परिधान करून हा वैज्ञानिक कोर्टाच्या आवारात गेला व स्फोटानंतर तेथून तो पसार झाला.
या वैज्ञानिकाचे त्याच्या शेजारी राहणारा वकिल अमित वशिष्ठ यांच्याशी अनेक कारणावरून वाद होते व दोघांनी एकमेकांच्या विरोधात अनेक खटले दाखल केले आहेत. वशिष्ठ यांना ठार मारण्यासाठीच या वैज्ञानिकाने हा स्फोट घडवल्याचे या तपासात निष्पन्न झाले आहे.