नागपूर – काही दिवसांपूर्वीच तेलंगनामध्ये दोन तरुणांनी विवाह केल्याची बातमी माध्यमांमध्ये आली होती. तर एका तरुणाने चक्क तृतीयपंथीयासोबत लग्न केल्याचं उदाहरण ताजं आहे. या पाठोपाठ आता नागपुरातही दोन तरुणींनी लग्न करण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी साखरपुडा देखील उरकला.
समाज आणि लोक काय म्हणतील याच्या पलीकडे जावून दोन तरुणींनी साखरपुडा उरकून घेतला. समलैंगिकतेकडे आकसाने पाहणाऱ्यांना या तरुणींनी आपल्या कृतीतून प्रत्युत्तर दिलं आहे.
समलैंगिकतेला आपल्याकडे नेहमीच संशयास्पद पद्धतीने पाहिलं जातं. मात्र तरी देखील नागपूरमध्ये दोन मुलींनी साखरपुडा केला असून या साखरपुड्याला त्यांनी “कमिटमेंट एनिव्हर्सरी” असं नाव दिलं आहे. सुरभी मित्रा आणि पारोमिता मुखर्जी असं या धाडसी तरुणींचं नाव आहे.
पुढील काळात सुरभी आणि पारोमिता लग्न करणार असून लग्नाला “सिव्हिल युनियन” असं नाव देणार आहेत. सुरभी ही पेशाने डॉक्टर आहे. तर पारोमिता एका कंपनीत काम करते. या अनोख्या साखरपुड्याला दोघींच्या नातलगांनी हजेरी लावली होती.
दरम्यान पारोमिता ही मुळची कोलकात्याची. मात्र तिच्या घरच्यांचा या साखरपुड्याला विरोध होता. अखेरीस पारोमिताच्या वडिलांनी मुलीच्या प्रेमापोटी या संबंधाला मान्यता दिली. त्यानंतर साखरपुडा पार पडला.
सुरभी आणि पारोमिता यांनी आपल्या संसाराची स्वप्न रंगविण्यास सुरुवातही केली. आपल्या घरात किती सदस्य असतील. आपल्याला मुलबाळ कसं होईल, याचे नियोजन सुरू केले आहे. या दोघींचे कुटुंबीय उच्चशिक्षीत आहेत. पुढील वर्षभरात आम्ही लग्न करणार असल्याचं दोघांनी म्हटलं आहे.