नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करणाऱ्या जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याने त्या परिसरातील काही फोटो पाकिस्तानमधील आपल्या म्होरक्याला पाठवले. मात्र ते फोटो फार लांबून घेण्यात आले होते. तसेच ते स्पष्ट नव्हते, अशी माहिती नागपूर पोलिसांनी दिली आहे
या कथित दहशतवाद्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल येथील मुख्यालयापर्यंत जाण्याचे ही प्रयत्न होते. मात्र, त्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था असल्याने त्याचा बेत फसल्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. या दहशतवादाचे नाव जरी पोलिसांनी स्पष्ट केले नसले तरी त्याच्या विरोधात नागपुरात युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून केंद्रीय तपास यंत्रणा आणि नागपूर पोलीस मिळून तपास करत असल्याचे पोलीस आयुक्त म्हणाले.
संघ मुख्यालयासह रिझर्व्ह बॅंक इतर संवेदनशिल भागाची रेकी केल्याचे पुढे आले आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी या भागात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. सुरक्षेची पूर्ण व्यवस्था केली आहे. या प्रकरणाचा क्राइम ब्रॅंच तपास करत आहे.
या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, कोण-कोणत्या ठिकाणी रेकी करण्यात आली आहे, याचा तपास सुरू आहे. सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्था वाढवली आहे. जर दहशतवादी संघटनेकडून कोणताही हल्ला तर पोलीस सज्ज आहे, असेही त्यांनी सांगितले.
आतापर्यंतच्या तपासाप्रमाणे या दहशतवाद्याला नागपुरात कोणीही मदत केली नव्हती. दरम्यान, भविष्यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्याचा ताबा नागपूर पोलीस घेईल, अशी माहितीही अमितेश कुमार यांनी दिली.