नवी दिल्ली – जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत. मात्र गेल्या दोन महिन्यापासून देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ न झाल्यामुळे तेल कंपन्यांना तोटा होत आहे. सध्या प्रत्येक लिटर डिझेल विक्रीमागे तेल कंपन्यांना 20 रुपये 40 पैशाचा तोटा होत आहे. तर पेट्रोल विक्रीत प्रत्येक लिटरला 17 रुपये 10 पैशाचा तोटा होत असल्याचे सांगण्यात येते.
एकीकडे पेट्रोल आणि डिझेल विक्रीत तोटा होत असला तरी काही कंपन्या रशियातून स्वस्त कच्चे तेल खरेदी करीत आहेत आणि शुद्धीकरण केलेले उत्पादन अमेरिकेसारख्या विकसित देशांना बाजारभावाने विकत आहेत. त्यामुळे त्यांना प्रचंड नफा होत असल्याचे बोलले जाते.
ब्रिटनमध्ये काही कंपन्या रशियातून स्वस्त तेल खरेदी करून शुद्धीकरण केलेली उत्पादने इतरांना बाजारभावाने विकत असल्यामुळे त्यांना प्रचंड नफा होत होता. त्यांच्या या नफ्यावर ब्रिटिश सरकारने परवा विंडफॉल टॅक्स लावला आहे. भारतातील तेल कंपन्यांना असा कर लावणार का असे विचारले असता पेट्रोलियममंत्री हरदिप सिंह पुरी यांनी सांगितले की या बाबीवर विचार करण्याचे काम अर्थमंत्रालयाच्या आहे.
कच्च्या तेलाचे भाव 85 डॉलर प्रति पिंप असताना देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरले होते. तेच दर सध्या लागू आहेत. तर दरम्यानच्या काळामध्ये कच्च्या तेलाचे दर 120 हॉलरच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे भारतातील तेल कंपन्यांना मोठ्या प्रमाणात तोटा होत असल्याचे सांगितले जाते. मात्र याच कंपन्यांना निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होतो.
देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढून महागाई वाढण्याची शक्यता वाढल्यामुळे गेल्या महिन्यामध्ये अर्थमंत्रालयाने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क आठ रुपयांनी तर डिझेल वरील उत्पादन शुल्क सहा रुपयांनी कमी केले आहे.
मात्र असे असले तरी पेट्रोल आणि डिझेल विक्रीमध्ये देशात या तेल कंपन्यांना तोटा होत आहे. तर हेच पेट्रोल आणि डिझेल निर्यात केल्यानंतर या कंपन्यांना फायदा होत आहे. दरम्यान भारत सरकारने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे चालूच ठेवले असून भारतातील कंपन्यानी रशियाकडून आतापर्यंत साडेतीन कोटी पिंप कच्चे तेल विकत घेतले असल्याचे बोलले जाते. मात्र नेमके किती तेल घेतले आहे आणि ते कोणत्या भावाने घेतले आहेत हे कंपन्या किंवा सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.