सातारा – कातरखटाव (ता.खटाव) येथील केशव मेडिकलचे मालक तानाजी देशमुख यांचे बंद घर फोडून शुक्रवार (दि.15) रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास तेरा लाख रूपये किंमतीचे पंचवीस तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेहल्याची घटना घडली होती. या घटनेचा तपास करताना वडूज, दहिवडी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेजस तानाजी देशमुख (वय 20) याला ताब्यात घेत,त्याच्याकडून चोरीला गेलेले सोने हस्तगत केले आहे. तेजस हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असून त्यामध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठीच त्याने चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
याबाबत मिळालेली माहिती अशी, कातरखटाव येथील मुख्य चौकात असलेल्या केशव मेडिकलचे मालक तानाजी देशमुख यांची पत्नी शुक्रवारी सकाळी साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास घर बंद करून मेडिकलमध्ये गेल्या होत्या. दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात ठेवलेले पंचवीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेहले होते. ही घटना शुक्रवारी दुपारी त्यांच्या लक्षात आल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वडूज,दहिवडी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. भरदिवसा कातरखटाव सारख्या निमशहरी गावात चोरी झाल्याने पोलिसांकडून कसून तपास सुरु होता.
मात्र, त्यांच्या हाताला काहीच लागत नव्हते. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर यांनी तेजस याच्याकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला;परंतू त्याने आईचा आसरा घेतल्याने त्यांना यश आले नाही. दरम्यान घटनास्थळी आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर यांनी बनसोडे व केंगले या दोन सहकार्यांसह तेजसला त्याच्याच घराच्या वरच्या मजल्यावर चौकशीसाठी नेहले.
चौकशीदरम्यान त्याने संशयास्पद उत्तरे दिल्याने तासगांवकर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला मायणी पोलीस दुरक्षेत्र येथे नेहले. मायणीत तेजसला व त्याच्या एका मित्राला पोलिसी हिसका दाखवताच त्याने चोरीची कबुली देताना चोरलेले सोने वडूज येथे एकाच्या खोलीत ठेवल्याची कबुली दिली. गावातील मोहिते नावाच्या मित्रासोबत शेअर मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक लाॅसमध्ये गेल्याने लोकांची देणी भागवण्यासाठी चोरीचा प्रकार केल्याचे तेजसने तपासादरम्यान पोलिसांना सांगितले आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख हे करत आहेत.