नवी दिल्ली : आसामच्या करीमगंज जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. एका महिलेला सासरच्या मंडळींनी जबरदस्तीने अॅसिड पाजवून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुमना बेगम असे त्या मृत महिलेचे नाव असून पोलिसांनी नवरा शकील अहमद आणि त्याच्या आईला अटक केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमनाच्या सासरच्या मंडळींना मुलगा हवा होता. मात्र, तिने मुलीला जन्म दिला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुमनावर सासरच्या मंडळींकडून शाररीक आणि मानसिक छळ होत होता. अखेर चिडलेल्या नवऱ्याने सुमनाला मारहाण केली.
दरम्यान, तिला अॅसिड पिण्यास भाग पाडल्याचे सांगण्यात येत आहे. या सगळ्या प्रकारात शकीलच्या आईनेही त्याला साथ दिली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. करीमगंज जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पद्मनाभ बरुआ यांनी, मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.
घटनेनंतर सुमनालाल रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी शकील आणि त्याच्या आईला अटक केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.