लोणी काळभोर (पुणे)- माझे कुटुंब, माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षक व आशा सेविकांनी मतदार यादीत नाव असणाऱ्या नागरिकांचेच सर्वेक्षण केले. लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन ग्रामपंचायत हद्दीमधील तीस टक्क्यांहून अधिक नागरिकांचे करोना विषयक सर्वेक्षण झाले नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
सोमवारी (दि. 21) दिवसभरात कदमवाकवस्ती व लोणी काळभोर या दोन ग्रामपंचायत हद्दीतील 9068 कुटुंबातील 31,823 नागरिकांची तपासणी करण्यात आली. मात्र दोन्ही ग्रामपंचायत हद्दीतील लोकसंख्या पन्नास हजारांहून अधिक आहे. त्यामुळे करण्यात आलेल्या सर्वेक्षणापासून तीस टक्क्यांहून अधिक नागरिक दूर राहिले असतील तर सर्वेक्षणाचा हेतू सफल होणार का? करोनाचा प्रादुर्भाव रोखणार कसा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे या दोन्ही ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांचे फेरसर्वेक्षण करण्याची मागणी अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू केली आहे.
‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील 4828 कुटुंबातील 15707, तर लोणी काळभोर हद्दीतील 4240 कुटुंबातील 16116 नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामुळे दोन्ही ग्रामपंचायत हद्दीमधील वीस हजाराहुन अधिक नागरीकांचे सर्वेक्षण झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार हे सर्वेक्षण 750 शिक्षकांनी केले. यामध्ये थर्मल रिडींग घेऊन ऑक्सिजन पातळीची तपासणी करण्यात आली. तसेच व्याधिग्रस्त व्यक्तींची विशेष काळजी घेण्याच्या सूचना त्यांचे कुटुंबीयांना देण्यात आल्या.
- लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही ग्रामपंचायत हद्दीतील नागराकांचे सर्वेक्षण मतदार यादीनुसार झाले आहे. अनेक नागरिक सर्वेक्षणापासुन वंचित राहिले ही बाब खरी आहे. दोन्ही ग्रामपंचायत हद्दीतील उर्वरित नागरिकांचे पुढील चार ते पाच दिवसांत फेरसर्वेक्षण करण्याचे नियोजन करण्यात येईल.
-प्रशांत शिर्के, गटविकास अधिकारी हवेली