- दोन दिवसांत 72 हजार 500 रुपये दंड वसूल
पवनानगर – विनामास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करता फिरणाऱ्या तब्बल 268 जणांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शनिवार व रविवारी कारवाई करीत 72 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला.
विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. लोणावळा शहर व ग्रामीण भागात यावर्षी पर्यटनबंदी असताना देखील शनिवार व रविवार पर्यटकांची गर्दी होत आहे. या दोन दिवसांत लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणावरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल जांभळे, शकील शेख, हनुमंत शिंदे, सिताराम बोकड, देविदास चाकणे, अजित ननवरे, अमित ठोसर यांच्या पथकाने ही कारवाई केली. वरसोली टोलनाका, कार्ला फाटा, मळवली, कुसगाव, टायगर पॉईट व पवनानगर येथे वेगवेगळ्या पथकांनी ही कारवाई केली. पुढे देखील कारवाई सुरूच राहणार आहे.
करोना या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनस्तरावर उपाययोजना राबविल्या जात असताना नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे प्रकार वाढू लागले आहेत. सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करीत नागरिक बिनधिक्तपणे फिरू लागल्याने करोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे.
पर्यटनबंदीचा आदेश असताना देखील दुचाकी व चारचाकी वाहनांतून पर्यटक पर्यटनास्थळांकडे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत, यामुळे शनिवार व रविवारी लोणावळा व परिसरात पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.