सातारा एसीबीची कारवाई; कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
सातारा (प्रतिनिधी) : कंपनीच्या उत्पादनाच्या पॅकींगवर उत्पादनाची तारीख व एमआरपी हे दोन शब्द चुकल्याचे कारण पुढे करून तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कराड येथील वैधमापन शास्त्र कार्यालयाचा निरीक्षक लहू उत्तम कुटे (रा.कोल्हापूर), क्षेत्र सहाय्यक चंद्रकांत राजाराम जाधव (रा.आंबेगाव,ता.कडेगाव,जि.सांगली) या दोघांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कराड परिसरातील एका महिलेच्या नावाने एक कंपनी सुरू आहे. त्या कंपनीतून उत्पादित होणाऱ्या मालाच्या पॅकिंगवर उत्पादनाची तारीख व एमआरपी चुकीची प्रिंट झाली होती. त्यामुळे कंपनीवर कारवाई न करण्यासाठी संशयितांनी दहा हजार रुपयाची मागणी केली होती. त्यानंतर संबंधित महिलेच्या पतीने सातारा येथील एसीबीच्या कार्यालयात लेखी तक्रार केली.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस उपाधीक्षक अशोक शिर्के यांनी तक्रारीची पडताळणी करण्यासाठी एक पथक कराडला पाठवले.पडताळणीअंती संशयित दहा हजार रुपये मागत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तातडीने त्यांच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस अधीक्षक (एसीबी) राजेश बनसोड, अप्पर अधीक्षक (एसीबी) सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राजे, पोलीस शिपाई काटकर, भोसले यांनी ही कारवाई केली.