भुलेश्वर – माळशिरस (ता. पुरंदर) गावचे लोकनियुक्त सरपंच महादेव बोरावके यांच्या विरोधातील अविश्वास अविश्वास ठराव 10 विरुद्ध 1 मताने मंजूर करण्यात आला आहे.
माळशिरसचे सरपंच ग्रामपंचायत सदस्यांना विचारात न घेता स्वतः कारभार करतात तसेच मनमानी कारभार करीत होते असा आरोप उपसरपंचनंदा गायकवाड यांच्यासह 9 सदस्यांनी पुरंदरच्या तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करीत सोमवारी (दि. 24) अविश्वास ठराव दाखल केला होता.
त्यानुसार सोमवारी (दि. 31) माळशिरस ग्रामपंचायत कार्यलयामध्ये तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. यात उपसरपंच नंदा बाळकृष्ण गायकवाड यांनी विषय मांडला व ग्रामपंचायत सदस्य मोहन यादव यांनी त्यास अनुमोदन दिले. यानंतर हात वर करून मतदान घेण्यात आले यामध्ये 10 सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने हात करून मतदान केले. यामुळे माळशिरसच्या सरपंचपदाचा अविश्वास ठराव 10 विरुद्ध 1 असा मंजूर करण्यात आला.
हा अविश्वास ठराव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कळविले जाईल. त्यावर जसे आदेश होतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. त्यानंतर गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेतली जाईल व पुढील निर्णय ठरविले जातील, असे तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी नमूद केले.
हे 10 सदस्य विरोधी गटाचे आहेत; परंतु सर्व सदस्य माझ्या कुटुंबातील आहेत या पद्धतीने मी काम करीत होतो. थेट जनतेतून निवडून आल्याने माझा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याची वाट बघून त्यांनी एकत्रित येवून अविश्वास ठराव आणला; परंतु घराणेशाहीच्या मागे न जाता माळशिरसमधील सर्व सामान्य जनतेच्या पाठीमागे राहून जनतेला न्याय देणार आहे.
– महादेव बोरावके, सरपंच माळशिरस