पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसेसच्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दैनंदिन उत्पन्नही 75 लाखांच्या घरात पोहोचले आहे. याशिवाय, पीएमआरडीए हद्दीतील प्रवासी सेवेला प्रतिसाद मिळत आहे. रविवारी दिवसभरात केवळ 7 मार्गांवरील 45 बसेसद्वारे सुमारे साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
पीएमपीची प्रवासी सेवा लॉकडाऊननंतर टप्प्याटप्प्याने मार्गावर येत असून, प्रवासी संख्या आणि उत्पन्नातदेखील वाढ होत आहे. सध्या दररोज 1 हजारहून अधिक बसेस धावत आहेत. तर, 12 डिसेंबरपासून पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत 12 मार्गांवर सुरू केलेल्या बससेवेलादेखील प्रतिसाद वाढत आहे. या मार्गांवर सुमारे 70 बसेस सोडण्यात येत आहेत.
रविवारीचा सुटीचा दिवस असतानाही पीएमआरडीए हद्दीतील बससेवेद्वारे 4 लाख 65 हजार 714 रुपये प्राप्त झाले. त्यापैकी जेजुरी मार्गावरील बसेसला सर्वाधिक 1 लाख 21 हजार 395 रुपयांचे, तर रांजणगाव मार्गावरील बसला 1 लाख 16 हजार 415 रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर सोमवारी सर्वाधिक 74 लाख 85 हजार 056 रुपयांची उत्पन्न प्राप्त झाले आहे.