Arvind Kejariwal : आम आदमी पार्टी (AAP) आणि काँग्रेसमध्ये जागांवरून संघर्ष सुरूच आहे. पंजाब आणि चंदीगडमधील लोकसभेच्या सर्व जागांवर आप उमेदवार उभे करणार आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. पंजाबमध्ये आपने घेतलेल्या निर्णयामुळे केजरीवाल हे देखील इंडिया आघाडीला रामराम ठोकणार का ? असा सवाल उपस्थित झाला आहे.
त्याचवेळी दिल्लीत काँग्रेस आणि आप यांच्यात चर्चा सुरू असल्याचे देखील समजते. दिल्लीत लोकसभेच्या सात जागा आहेत, मात्र काँग्रेस आणि आपमध्ये जागावाटपावर अद्याप एकमत झालेले नाही. जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे दोन्ही पक्षांचे म्हणणे आहे.
पंजाबमध्ये ‘आप’ स्वबळावर लढणार
आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी सांगितले की त्यांचा पक्ष पंजाबमधील 13 लोकसभेच्या आणि चंदीगडमधील एका संसदीय जागेसाठी उमेदवार जाहीर करेल. आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी त्यांनी जनतेकडून आशीर्वाद मागितले. पंजाब सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत रेशनच्या ‘डोअरस्टेप डिलिव्हरी’साठी आयोजित सभेला संबोधित करताना केजरीवाल यांनी ही घोषणा केली.
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी AAP च्या तयारीबद्दल विचारले असता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की या महिन्याच्या अखेरीस आम्ही पंजाबमधील आमचे सर्व 13 उमेदवार आणि चंदीगडमधील एक उमेदवार जाहीर करू.